भाजपचा लिफाफा पॅटर्न..? उमेदवार निवडीसाठी नवी खेळी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला फटका बसला होता. शिवसेना व राष्ट्रवादीत तोडफोड होऊन हे दोन्ही पक्ष महायुतीत सहभागी असतानाही, भाजपला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने ताकही फुंकून पिण्याचे धोरण अवलंबिलेले दिसते.
गेल्या महिनाभरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी महाराष्ट्रात तीन दौरे केले. प्रत्येक दौऱ्यात त्यांनी भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गरदर्शन केले. त्यांच्यात उत्साह भरला. पूर्ण ताकदीने कामाला लागण्याच्या सूचना देत त्यांना बुस्टर डोस दिला.
कार्यकर्त्यांसाठी आता लिफाफा पॅटर्न?
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कानमंत्रानंतर महाराष्ट्र भाजपने मरगळ झटकली. महायुतीच्या जागावाटपात भाजप 155 ते 160 जागांवर लढेल, अशी रणनिती तयार करण्यात आली आहे. भाजपने ठेवलेल्या या मोठ्या लक्ष्यासाठी, वेगळा पॅटर्नही राबवविला जाणार असल्याच्या चर्चा आहेत. ज्या मतदारसंघात भाजपला उमेदवारी करायची आहे तेथे कार्यकर्त्यांसाठी लिफाफा पॅटर्न राबवविला जाणार आहे. ज्या मतदारसंघात भाजप उमेदवार देणार आहेत तेथील स्थानिक पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पक्षनिरीक्षक पाठवून पसंती क्रमाची तीन नावे बंद लिफाफ्यात घेतली जाणार आहेत. ही तीन नावे प्रत्येकाच्या पसंतीक्रमानुसार असतील. त्यानंतर हे लिफाफे वरिष्ठांकडे पाठवून उमेदवार ठरविला जाणार आहे.

शेवगाव-पाथर्डीतील पदाधिकाऱ्यांत वाद
शेवगाव-पाथर्डीत भाजपचा उमेदवार कोण असावा, यासाठी नगरच्या शासकीय विश्रामगृहात मंगळवारी बैठक झाली. शेवगाव-पाथर्डीचे पदाधिकारी तेथे आले होते. कोणत्याही तीन उमेदवारांची पसंतीक्रमाने नावे लिहून, ती बंद लिफाफ्यात पक्ष निरीक्षकांकडे द्यायची होती. यासाठी पक्षाने अरुण साने यांना निरीक्षक म्हणून यासाठी पाठवले होते. मात्र या बैठकीत राडा झाला. पदाधिकारी नसलेले व्यक्ती मतदान करताहेत, असा आरोप शेवगाव भाजपचे तुषार वैद्य, अरुण मुंडे व पाथर्डीचे गोकुळ दौंड यांनी केला. त्यानंतर आ. राजळे समर्थकांनी त्यावर आक्षेप घेतला आमि गोंधळ वाढला. अखेर निरीक्षकांनी ही प्रक्रीयाच थांबवली.
जागावाटपावर लवकरच होणार निश्चिती
भाजपने 155 ते 160 जागांवर लढण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. सह्याद्री अतिथीगृहावर अमित शाह यांची महायुती आणि भाजपच्या नेत्यांसोबत बैठक झाली. महायुतीचा राज्यातील नेत्यांची वादातीत जागांवर चर्चा पार पडल्यानंतर आजच्या बैठकीत अमित शाह यांच्याकडे या जागांची माहिती देण्यात येणार आहे. नवरात्रातच महायुतीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमिवर सध्या मॅरेथाँन बैठका सुरु आहेत. लवकरच महायुतीचे जागावाटप फायनल होईल, असेही सांगितले जात आहे.












Click it and Unblock the Notifications