Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सुनील केदार यांच्या विरोधात भाजपचे धनोजी कुणबी कार्ड? सावनेर मतदार संघात काँग्रेसचा नवा चेहरा कोण?

Maharashtra Assembly Election 2024 : नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे किंग मेकर सुनील केदार यावेळी विधानसभा निवडणुकीत उमेदवार नसणार आहेत. वर्ष 1995 ते 2019 या दरम्यान सावनेर मतदारसंघातील सहापैकी पाच निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करून केदार यांनी सावनेर मतदार संघाला कॉंग्रेसचा बालेकिल्ला केले. यावेळी या मतदारसंघात कॉंग्रेसकडून केदार यांच्या पत्नी अनुजा केदार या उमेदवार असू शकतात. त्यांना पराभूत करण्यासाठी भाजप या मतदारसंघात धनोजी कुणबी समाजातील उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ही निवडणूक विकास कामांसाठी ऐवजी जाती-पोटजातीवर होणार हे निश्चित झाले आहे.

बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांना शिक्षा झाली. त्यामुळे न्यायालयाने त्यांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्याची बंदी घातली. त्यामुळे आता सावनेर विधानसभा मतदारसंघात केदार हे उमेदवार नसणार आहेत, हे स्पष्ट झाले. पण, आपला राजकीय वारस ते कुणाला घोषित करणार याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे काँग्रेसला आता त्यांच्या बालेकिल्ल्यात नवा चेहरा द्यावा लागणार आहे.

Maharashtra Assembly Election 2024

काँग्रेसकडून कोण?

2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता आहे. इच्छुकांमध्ये केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांचे नाव आघाडीवर आहे. अनुजा यांची राजकीय पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. त्या नागपूरच्या पहिल्या महिला महापौर कुंदाताई विजयकर यांच्या कन्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अनुजा केदार यांनी सावनेरमध्ये जनसंपर्क वाढवला आहे आणि त्या काँग्रेसच्या प्रबळ उमेदवार मानल्या जातात. मात्र, सुनील केदार यांचा विश्वासू कार्यकर्ता बाबा कोढे यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यालाही संधी मिळू शकते. इच्छुक उमेदवार म्हणून कोढे यांच्या नावाचीही चर्चा आहे.

भाजपकडून कोण?

सावनेर विधानसभेत भाजपकडून कोणता उमेदवार असेल याची अद्याप अनिश्चितता आहे. मागील निवडणुकीत भाजपने डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवारी दिली होती, परंतु त्यांनी यावेळी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. आता यावेळी भाजपकडून 'धनोजे कुणबी कार्ड' खेळण्याची तयारी आहे. त्यातच सुनील केदार यांचे समर्थक मनोहर कुंभारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते भाजपकडून इच्छुक आहेत. दुसरीकडे भाजपकडून स्वर्गीय सोनबा मुसळे यांच्या पत्नी कल्पना मुसळे यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मुसळे परिवार धनोजे कुणबी समाजाचे नेतृत्व करते, त्यामुळे या समाजाचे समर्थन मिळवण्यासाठी भाजप त्यांना निवडणूक रिंगणात उतरवू शकते.

Take a Poll

दरम्यान, भाजपकडून सुनील केदार यांचे कट्टर राजकीय विरोधक आशीष देशमुख यांनाही रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. 1995 आणि 2009 साली केदार विरुद्ध देशमुख अशी लढत झाली होती, आणि दोन्हीवेळा केदार विजयी ठरले होते. यावेळी तिसऱ्यांदा सावनेरच्या निवडणुकीत ते समोरासमोर असण्याची शक्यता आहे. मात्र, स्थानिक भाजप नेत्यांकडून देशमुख यांना किती प्रमाणात सहकार्य मिळेल यावर त्यांच्या विजयाची शक्यता ठरेल.

सावनेरची जातीय समीकरणे

सावनेर मतदारसंघातील जातीय समीकरणेही महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. 2019 च्या निवडणुकीत सुमारे 53 हजार दलित मतदार होते, तर 28 हजार आदिवासी मतदार देखील निर्णायक ठरू शकतात. मुस्लिम मतदारांची संख्या सुमारे 11 हजार आहे. सावनेरमध्ये ग्रामीण आणि शहरी मतदारांचे प्रमाण 60-40 असे आहे. या मतदारसंघात धनोजे कुणबी समाजाची मते निर्णायक आहेत.

या आहेत समस्या

बेरोजगारी, ग्रामीण भागातील रस्ते, शेतमालाचा भाव या मतदारसंघातील‌ समस्या असल्याचे मतदारांनी सांगितले. दुसरीकडे या समस्या सोडविण्यासाठी केदार यांनी मोठे काम केल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.

गतवेळी काय झाले होते?

सावनेर विधानसभा मतदारसंघातून गतवेळी काँग्रेसचे सुनील केदार यांनी भारतीय जनता पक्षाचे राजीव भास्करराव पोतदार यांचा 26 हजार 291 मतांच्या फरकाने पराभव करून जागा जिंकली. सावनेर विधानसभा मतदारसंघ हा रामटेक लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या राजू पारवे यांचा पराभव करून 76 हजार 768 मतांच्या फरकाने विजय मिळवला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+