Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जामनेरमध्ये गिरीश महाजन यांना शरद पवारांनी घेरले, दिलीप खोडपे यांचे कडवे आव्हान

Maharashtra Assembly Election 2024 : जामनेर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे नेते, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन सातव्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. महाजन हे राज्यात पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखालील विजयाची मालिका 1995 पासून सुरू झाली आणि आतापर्यंत त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही.

1995 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार ईश्वरलाल जैन यांचा पराभव करून महाजन यांनी आपल्या राजकीय करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ईश्वरलाल जैन यांचा दुसऱ्यांदा पराभव केला, तसेच संजय गरूड, माजी नगराध्यक्ष राजू बोहरा, आणि डिगंबर पाटील यांना नमवत आपली ताकद सिद्ध केली.

Bjp Leader Girish Mahajan vs Dilip Khodpe

विरोधकांची रणनीती आणि खोडपे यांचे आगमन

यावेळी महाविकास आघाडीने महाजनांविरोधात नवी रणनीती आखली आहे. त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष गाठणाऱ्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांना उमेदवारी दिली आहे. खोडपे हे पूर्वी महाजनांचे सहकारी होते आणि एकेकाळी त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. मात्र, आता ते महाजनांविरोधात निवडणूक लढवणार आहेत. या लढतीमुळे निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे. महाजन यांनी विरोधकांना भाजपमध्ये सामील करून आपला पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न केला. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीतून त्यांचे प्रतिस्पर्धी राहिलेले संजय गरूड हे आता भाजपच्या तंबूत आहेत. त्यामुळे महाजनांविरोधात खोडपे यांच्याकडून कोणती रणनीती आखली जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

निवडणुकीतील प्रमुख मुद्दे

गिरीश महाजन यांनी विविध खात्यांचे मंत्री म्हणून जामनेर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामांसाठी निधी आणला आहे. या निवडणुकीत त्यांचे समर्थक 30 वर्षांच्या विकासकामांचा प्रचार करत आहेत. विशेषतः रस्ते, पाणीपुरवठा, शैक्षणिक सुविधा,आणि ग्रामीण भागातील विकास या मुद्द्यांवर ते भर देत आहेत. मात्र विरोधकांनी शेतीमालाला भाव,औद्योगिक विकासाचा अभाव, आणि बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रभाव

जामनेर मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपला मोठी मदत मिळू शकते. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रक्षा खडसे यांना जामनेर मतदारसंघातून तब्बल 36 हजार मतांची आघाडी मिळाली होती. हा आकडा महाजनांसाठी आशादायी मानला जात आहे.

2019 ची निवडणूक आणि आधीचे निकाल

2019 मध्ये गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय गरूड यांचा 35 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. वंचित बहुजन आघाडीचे भीमराव चव्हाण यांना 6,471 मते मिळाली होती, तर 2,105 मतदारांनी नोटावर शिक्का मारला होता. त्यापूर्वी 2014 आणि 2009 मध्येही महाजनांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता.

Take a Poll

सामाजिक समीकरणे आणि आव्हाने

जामनेर मतदारसंघात मराठा आणि आदिवासी समाजाची निर्णायक भूमिका असते. यंदाही मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो. मराठा आणि आदिवासी पाडे यांची कौल महाजनांना मिळेल की खोडपेंना हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच, अल्पसंख्यांक समाजाचा मतदारसंघातील प्रभावसुद्धा कळीचा ठरेल.जामनेरची ही लढत प्रस्थापित गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीच्या दिलीप खोडपे यांच्यात रंगणार आहे. विकासकामांचा मुद्दा आणि सामाजिक समीकरणे या निवडणुकीत महत्त्वाची ठरतील. भाजपच्या मजबूत गडाला खोडपे पाडण्यात यशस्वी होतात का, हे पाहणे रंजक ठरेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+