बडनेर्यात रवी राणा यांना सगळ्यांनी घेरलेय! विधानसभा निवडणुकीत बच्चू कडूंचा मोठा अडथळा, होणार दमछाक!
Maharashtra Assembly Election 2024 Bachu Kadu's challenge to Ravi Rana : अमरावती जिल्हा दोन नेत्यांमुळे कायम महाराष्ट्रात चर्चेत असतो. ते नेते म्हणजे बच्चू कडू आणि रवी राणा. रवी राणा महायुतीचे घटक असले तरीही भाजपच्या स्थानिक नेत्यांना ते नको आहेत. याचाच फटका नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार नवनीत राणा यांना बसला. पण, त्यांचे पती तथा बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांची यावेळची विधानसभेची वाट अत्यंत खडतर दिसत आहे. रवी राणा यांना महाविकास आघाडीचाच नाही तर भाजप आणि बच्चू कडू यांचाही विरोध आहे. त्यामुळे राणा यांना चौथ्यांदा विधानसभेत पोहोचणे सोपे नाही. आता बच्चू कडू हेही महायुतीतून बाहेर पडले.
तिरंगी लढतीची शक्यता
बडनेरा विधानसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढतीची शक्यता आहे. दरम्यान, भाजपने या ठिकाणी रवी राणा यांना उमेदवारी देऊ नये, अशी स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. आता तिसर्या आघाडीचे नेते बच्चू कडू त्यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीचा उमेदवार देणार हे निश्चित आहे. भाजपने राणा यांना उमेदवारी दिली नाही तर राणा अपक्ष मैदानात उतरतील हेही निश्चित आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार असणारच आहे. त्यामुळे रवी राणा यांना भाजपची उमेदवारी मिळो किंवा नाही या ठिकाणी लढत ही तिरंगी होणार हे आता स्पष्ट झाले.

भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी यांचा विरोध
बडनेरा विधानसभा मतदार संघात गेल्या निवडणुकीत रवी राणा हे काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी समर्थित उमेदवार होते, त्यांनी शिवसेनेच्या प्रीती संजय बंड यांचा 15 हजार 541 मतांनी पराभव केला होता. पण, निवडणुकीनंतर रवी राणा यांनी भाजपला पाठिंबा दिला. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आहेत. बडनेरा मतदार संघात याही वेळी त्यांनी तयारी केली आहे. पण, राणा यांना भाजपची उमेदवारी देऊ नका, अशी आग्रही मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांची आहे. आता रवी राणा यांच्याविषयी विरोधाचा सूर अधिक आक्रमक झाला आहे.
भाजपकडून हे आहेत इच्छुक
बडनेरा मतदार संघातून भाजपचे माजी नगरसेवक व प्रदेश कार्यकारिणी सदस्य तुषार भारतीय, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, प्रदेश सचिव जयंत डेहनकर यांच्यासह अनेक नेते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. भाजपकडे सक्षम नेते असताना आम्ही राणांच्या दरबारात मुजरा करायला जाणार नाही.
भाजपच्या निष्ठावंत नेत्यांपैकी कोणालाही उमेदवारी द्या. आम्ही विद्यमान आमदाराला हरवून भाजपचा उमेदवार निवडून आणू, अशी आग्रही मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत, या भावनांकडे पक्षाने दुर्लक्ष केले तर लोकसभा निवडणुकीपेक्षा मोठे अपयश पदरी येईल, असा इशारा देखील कार्यकर्त्यांनी दिला. वरिष्ठ भाजपा नेत्यांशी जवळीक आणि खालच्या कार्यकर्त्यांवर वरवंटा फिरवणारे रवी राणा आम्हाला नको, असा सूर आता व्यक्त आहे.
बडनेर्यातून नवनीत राणा यांना मिळाले होते मताधिक्य
नवनीत राणा तीन लोकसभा निवडणूक लढल्या. त्यांचे पती आमदार असताना पूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये बडनेरा मतदार संघात त्या पिछाडीवर होत्या. यावेळी म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत
भाजपचे कमळ हे पक्षचिन्ह घेताच त्यांना बडनेरा मतदार संघात उल्लेखनीय मताधिक्य मिळाले. हे मताधिक्य भाजपमुळे मिळाले, असा दावा स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे यावेळी विधानसभा निवडणुकीत रवी राणा यांना भाजपची उमेदवारी नको, अशी मागणी होत आहे.
महाविकास आघाडीतून हे आहेत इच्छुक
महाविकास आघाडीत हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला जाऊ शकतो. गत वेळ शिवसेना आणि भाजप युतीच्या उमेदवार असलेल्या प्रीती बंड यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. त्या ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख आहेत. याही वेळी ठाकरे गटाकडून त्यांनी बडनेरा मतदार संघात तयारी सुरू केली आहे. पण, अनंत गुढे,
सुनील खराटे, प्रशांत वानखडे, आशीष धर्माले, पराग गुडधे आणि सागर देशमुख हेही या ठिकाणी इच्छुक आहेत.
या आहेत समस्या?
बडनेरा मतदार संघातील 70 टक्के मतदार शहरी भागातील आहेत. याच भागात विकास कामे केली जातात, असा ग्रामीण मतदारांचा आरोप आहे. युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा, यासाठी एमआयडीसी, या रेल्वे मार्गावरून अधिक रेल्वे सुरू कराव्या, अशीही अपेक्षा आहे.












Click it and Unblock the Notifications