बच्चू कडूंना मोठा धक्का, प्रहारचा आमदार जाणार शिंदे गटात, राजकुमार पटेल सोडणार साथ?
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलं आहे. कोण कोणत्या पक्षात आहे, हेच आता सर्वसामान्यांना कळणं अवघड झालेय. एकमेकांचे नेते, कार्यकर्ते, आमदार यांची पळवा-पळवी राजकीय पक्ष करीत आहेत. पक्ष सोडण्याचा हंगामही तेजीत आहे. त्यातच आमदार बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडले आहेत.
विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून बच्चू कडू महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. मात्र, बच्चू कडू यांच्या मनसुब्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण प्रहारचे आमदार राजकुमार पटेल बच्चू कडू यांची साथ सोडण्याची शक्यता आहे.

पोस्टरवरून बच्चू कडू यांचा फोटो गायब
प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांच्या एका पोस्टरवरून अमरावतीमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बच्चू कडू यांचा फोटो राजकुमार पटेल यांच्या पोस्टरवरुन गायब आहे. बच्चू कडू यांच्या जागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो आहे. आमदार राजकुमार पटेल हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
राजकुमार पटेल हे अमरावतीच्या धारणी (मेळघाट) विधानसभेचे प्रहारचे आमदार आहेत. आज ते कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीच्या पोस्टरवरुन बच्चू कडू यांचा फोटो गायब आहे. मेळघाट विधानसभा कार्यकर्ता संवाद बैठकीचा हा कार्यक्रम आहे.
या कार्यक्रमाच्या पोस्टरवर राजकुमार पटेल आणि त्यांचे पुत्र धारणी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रोहित पटेल यांचे फोटो आहेत. तर एकनाथ शिंदे यांचा देखील फोटो आहे. मात्र बच्चू कडूंचा यांचा फोटो नसल्याने राजकुमार पटेल यांच्या या पोस्टरची चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकुमार पटेल काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राजकुमार पटेल यांची राजकीय कारकीर्द
- राजकुमार दयाराम पटेल प्रहार हे जनशक्ती पक्षाचे भारतीय राजकारणी आहेत. ते आता शिंदे गटात जाणार आहेत.
- 24 ऑक्टोबर 2019 रोजी ते मेळघाटमधून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.
- मेळघाट विभागातील आदिवासी कोरकू समाजातून निवडून आलेले तीन वेळा आमदार (विधानसभा सदस्य), ते जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, जे वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाशी थेट संबंध ठेवण्यासाठी ओळखले जातात.
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत आमदार दयाराम पटेल यांचे ते पुत्र आहेत
- अमरावती विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर राजकुमार पटेल यांनी राजकारणात प्रवेश केला आणि 1995 मध्ये बसपाच्या तिकिटावर पहिली आमदारकीची निवडणूक लढवली आणि अतिशय कमी फरकाने त्यांचा पराभव झाला.
- 1999 मध्ये भाजपच्या तिकिटावर त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत रामू पटेल यांचा पराभव करून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. 2004 मध्ये आणखी एक विजय मिळवला. 2009 आणि 2014 मध्ये ते सलग दोनदा पराभूत झाले.
- 2019 मध्ये पटेल यांना आणखी एक संधी मिळाली, त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या तिकिटावर 50 हजार मतांनी विजय मिळवून आजपर्यंतचा त्यांचा सर्वात मोठा विजय मिळवला.












Click it and Unblock the Notifications