एकाचं ट्विट येतं, दुसऱ्याची क्लिप येते, कुणाल कामराला सुपारी कुणी दिली? फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं
स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते शोमध्ये सादर केल्याप्रकरणी नव्या वादाला तोंड फुटलं. या प्रकरणात कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मोठा इशारा दिला.

काय म्हणाले फडणवीस?
पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, "स्टँडअप कॉमेडी करण्याचा अधिकार कोणालाही आहे. मात्र, स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. खरं म्हणजे कुणाल कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्रातील जनतेने २०२४ साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार? हे दाखवून दिलेलं आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विरासत कोणाकडे गेली? हे जनतेने दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे खालच्या स्थराची कॉमेडी करून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अनादर करण्याचा अधिकार कोणालाही नाही, हे चुकीचं आहे", असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
स्वातंत्र्याचा स्वैराचार नको
फडणवीस पुढे म्हणाले की, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे. तसेच कुणाल कामरा जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत, ते संविधान जर त्यांनी वाचलं असेल तर संविधानाने सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की त्यांनी माफी मागितली पाहिजे", असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
व्यक्त केली ही शंका
कुणाल कामरावर कारवाई केली जाईल, असे मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. कुणाल कामरा याला कुणी सुपारी दिली, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण एकाचं ट्विट येते, दुसऱ्याची क्लिप येते. हा योगायोग असावा काय असा प्रश्नही फडणवीसांनी उपस्थित केला. ते म्हणाले, "एखादा स्टँडअप कॉमेडीयन अशा प्रकारे गद्दार म्हणू शकत नाही. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी ज्यांनी गद्दारी केली त्यांना खरी बसवण्याचं काण जनतेने केलेलं आहे. एखाद्याला कॉमेडी करण्याचा अधिकार आहे. मात्र, जर जाणूनबुजून अपमान करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर हे सहन केलं जाणार नाही. यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल", असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications