आऊटगोईंग थांबता थांबेना, अजित पवार गटाची आज तातडीची बैठक, मोठा निर्णय होईल..?
Ajit Pawar : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना महायुतीतील अजित पवार गटावर मात्र संकटामागून संकटे येत असल्याचे दिसत आहे. पक्षातील आऊटगोईंग थांबविण्यासाठी अजित पवार गटाचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक महत्त्वाची बैठक आज मुंबईत होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित केला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या बैठकीला पक्षातील सर्व आमदारांनी हजर राहावे, असे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटातील अनेक नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे दुसऱ्या पक्षात प्रवेश घेत आहेत. सध्या पक्षात आऊटगोईंग सुरु असल्याने अजित पवार हे आमदारांशी संवाद साधणार आहेत.

देवगिरी बंगल्यावर होणार महत्त्वाची खलबते
अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर त्यांच्या गटातील सर्व आमदारांची संध्याकाळी 7.30 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत सध्या सुरु असलेल्या आऊटगोईंगवर चर्चा केली जाणार आहे. त्यासोबतच सर्व आमदारांच्या मतदारसंघात नेमकी काय स्थिती आहे, याबद्दलचाही आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. यासोबतच या बैठकीत पक्षांतर्गत विधानसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित केला जाणार आहे.
बारामतीत अजित पवार नेमकं कुणाला उभं करणार
दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून अजित पवार हे संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करत आहेत. आता नुकतंच अजित पवारांच्या उपस्थितीत सोमवारी व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवारांनी घड्याळाला मतदान करा, असे आवाहन जनतेला केले. "तुमच्याकडे कोणीही आले तर ते सांगतील ते ऐकून घ्या. पण बटन दाबताना घड्याळाचंच बटन दाबा. देशात स्मार्ट सिटी म्हणून बारामतीची ओळख झाली. तुम्ही फक्त घड्याळाचे बटन दाबा, पुढील पाच वर्षात या शहराचा चेहरा मोहरा अजून चांगला करायची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे", असे अजित पवार म्हणाले. तुमच्या मनात जो उमेदवार आहे तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील", असं मोठं विधानही अजित पवारांनी केलं. "पुन्हा मला येता येणार नाही. मला राज्यात फिरावं लागणार आहे. आता तुमची सर्वांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडा", असे निर्देशही अजित पवारांनी दिले.












Click it and Unblock the Notifications