ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी काढली अजित पवारांच्या मुलाची लायकी; जाणून घ्या नेमका कशामुळे रंगलाय वाद?
Laxman Hake vs Ajit Pawar and Amol Mitkari : ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार शब्दयुद्ध सुरू आहे.
लक्ष्मण हाकेंना विधानसभेमध्ये फक्त 527 मतं पडली होती, त्यांनी त्यांची लायकी समजावी, त्यांनी अजित पवारांवर टीका करू नये, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला.
त्यावर आता लक्ष्मण हाके यांनी देखील प्रत्युत्तर दिले. तर अजित पवारांच्या मुलाचा निवडणुकीत पराभव झाला, त्यावरुन आता त्यांची लायकी शोधायची का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
एकंदरीतच लक्ष्मण हाके आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील वादात आता हाके यांनी थेट अजित दादांच्या मुलाच्या लायकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले, त्यामुळे आता हा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू झाली.

लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांविषयी काय म्हणाले?
अजित पवार हे पोल्ट्री फार्म वाले आहेत. त्यांनी ओबीसींचा निधी अडवला अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली होती. आता त्यांनी पार्थ पवार यांच्यावरही टीका केली. अजित पवारांचा मुलगा निवडणुकीत पडला. पार्थ पवार यांना पुन्हा राजकारणात आणता आलं नाही. त्याला पडलेल्या मतावरुन त्याची लायकी शोधायची का, असा प्रश्न लक्ष्मण हाकेंनी केला.
पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, अमोल मिटकरी हे बाजारु विचारवंत आहेत. मिटकरी अजितदादांच्या घरी झाडू मारतात, त्याबदल्यात त्यांना आमदारकी मिळालेली आहे. आम्ही जर मिटकरीला त्याच भाषेत उत्तर दिले तर त्याचेही कपडे राहणार नाहीत आणि अजितदादांची देखील कपडे राहणार नाहीत, असेही त्यांनी मिटकरींना टोला हाणला.
काय म्हणाले होते अमोल मिटकरी?
लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं. आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत आपलं डिपॉझिट गमावणारे लक्ष्मण हाके ओबीसींचे नेते कसे? 'लक्ष्मण हाकेंना आतापर्यंत लढलेल्या निवडणुकांमध्ये किती मत मिळाली हे त्यांनं पाहावं.
तुझ्याजवळ असलेली गाडी तू स्वतः घेतली की जनतेने दिली, हे तू खरं जनतेला सांगावं. 2014च्या निवडणुकीत त्याने निवडणूक लढण्यासाठी एका वकिलाकडून 50 हजार रुपये घेतले होते. त्यावेळी तुला फक्त 527 मत विधानसभेत मिळाली होती' अशा एकेरी उल्लेख करत आमदार अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर निशाणा साधला होता. अजितदादांशी तुलना करताना आपली औकात लक्ष्मण हाकेनी पाहावे, असेही ते म्हणाले.












Click it and Unblock the Notifications