माझ्यावर संभाजी भोसले यांनी हल्ला करायला लावला, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा संभाजीराजेंवर आरोप
Laxman Hake on Sambhaji Raje Chhatrapati : पुण्यात माझ्यावर जो हल्ला झाला त्याच्या पाठीमागे कोल्हापूरचा एक नेता आहे ते म्हणजे संभाजी भोसले. त्यांनी माझ्या अंगावर माणसे घातली. आम्ही त्यांना राजा म्हणणार नाही. हे राज्य कायद्याचे राज्य आहे. इथे लोकशाही आहे. राजेशाही कधीच संपली आहे. त्यामुळे आम्ही असले कोणालाही राजे मानत नाही. महाराष्ट्रातल्या एका ओबीसीच्या सर्वसामान्य कुटुंबातील पोरावरती हल्ला करायला लावणारा राजा कसा असू शकतो?, असा सवाल करत ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

ओबीसींच्या हक्काची लढाई थांबणार नाही
पुण्यात झालेल्या राड्यानंतर प्रा. लक्ष्मण हाके यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजे भोसले यांच्यावर हल्लाबोल चढवला. प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले की, ओबीसींची चळवळ कुठेही थांबवणारा हा कार्यकर्ता नाही. मग तलवारीचे वार झाले तरी चालतील कोणी गोळ्या घातल्या तरी चालेल आणि काहीही झालं तरी चालेल. आमचा जीव गेला तरी चालेल पण ओबीसींच्या हक्काची लढाई कुठेही थांबणार नाही.
पाठलाग करुन मला गाठले...
पोलिस ठाण्याबाहेर प्रा.हाके पत्रकारांशी बोलताना म्हणाले, पुण्यात रात्री झालेला प्रकार हा पूर्वनियोजित कट करून माझ्यावर हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संबंधित कार्यकर्ते माझे दोन्ही हात पकडून तसेच मान पकडून मी मद्य प्राशन केले असल्याचे कबूल करावे असा दबाव टाकत होते. मी कोणत्याही हॉटेल बारमध्ये मद्य प्राशन केलेले नाही. मित्राच्या घरी जेवण करून परतत असताना पाळत ठेवून असलेल्या आंदोलकांनी माझा पाठलाग करून मला रस्त्यात गाठले. दारू प्यायल्याचा आरोप करून ओबीसी आंदोलन बदनाम करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे. ओबीसी आंदोलन मी कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. माझ्या जीवितास धोका आहे, असे हाके म्हणाले. कोणत्याही चौकशीला सामोरे जायला मी तयार असल्याचे देखील ते म्हणाले.

नेमके काय घडले?
ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी दारु पिऊन छत्रपती संभाजीराजे आणि मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांना शिवीगाळ केल्याचा आरोप मराठा आंदोलकांकडून केला जात आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. हाके यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या मराठा कार्यकर्त्यांनाही शिवीगाळ करून हाके यांच्या कार्यकर्त्याने धक्काबुक्की केल्याचा आरोप करीत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने सोमवारी रात्री टिळकनगर भागात सोमवारी रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या राड्यानंतर हाकेंनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ओबीसीच्या एका पोराला अडवून अशाप्रकारे दादागिरी करण्याचा व मला बदनाम करण्याचा डाव संभाजी भोसले यांनी केला आहे.












Click it and Unblock the Notifications