'दादागिरी चालणार नाही', छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा, लातूर बंद...
Shivendraraje Bhosale on Chhava Sanghatna : राज्याचे मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी छावा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दम भरला आहे, आंदोलन करा, पण दादागिरी चालणार नाही, अन्यथा कारवाई होईल, असा थेट इशारा त्यांनी दिला. त्यामुळे लातूर बंदच्या हाकेनंतर आता लातूरात नेमकं काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागू आहेत.
नेमका वाद काय, ते आधी समजून घ्या?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळातील मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेने विरोध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या समोर रविवारी लातूरमध्ये छावााच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. तटकरे यांच्या अंगावर पत्ते उधळण्यात आले. परंतु, याघटनेनंतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी व छावा पदाधिकाऱ्यांचा वाद झाला. यात मारहाणीचा प्रकार घडला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी 'छावा'च्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर छावा संघटना चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

राज्यभरात सुरज चव्हाणांचा निषेध!
राज्यभरात अनेक ठिकाणी सुरज चव्हाणांचा निषेध व्यक्त करण्यात आला. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज लातूर बंदची हाक दिली. तर या घटनेनंतर सुरज चव्हाण यांनी जाहीर माफी मागितली. तसेच अजित पवार यांनी सुरज चव्हाण यांच्यावर कारवाई केली. त्यांना पदावरून हटविण्यात आले.
शिवेंद्रराजेंनी छावा पदाधिकाऱ्यांना काय दिला इशारा!
छावा संघटनेकडून लातूर बंद केल्यानंतर पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी लोकशाहीमध्ये आंदोलनाचा सर्वांना अधिकार आहे. जिल्हा प्रशासन आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये. त्याचबरोबर सर्वसामान्य आणि व्यापाऱ्यांना वेटीस धरलं जाऊ नये. ज्यांना स्वतःहून बंद मध्ये सहभागी व्हायचं आहे ते होतील. पण, जबरदस्ती आणि दादागिरी चालणार नाही, यावर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे, असा इशारा छावा संघटनेला त्यांनी दिलाय.
सुरज चव्हाणांचा राजीनामा
सूरज चव्हाण यांच्या विरोधात छावा संघटनेसह इतर मराठा संघटना देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. याची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली.
सुनील तटकरे यांच्या दौऱ्यातून सूरज चव्हाण यांना वगळण्यात आले. तसेच अजित पवार यांनी सोमवारी सूरज चव्हाण यांना तातडीने मुंबईला भेटण्यासाठी बोलावले होते. मात्र, सूरज चव्हाण यांनी कालच्या मारहाणीत बोट फ्रॅक्टर झाल्याचे कारण पुढे केले होते. त्यामुळे आपण उपचारासाठी लातूरमध्येच थांबणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. अजितदादांची भेट टाळून कारवाई लांबवण्याचा सूरज चव्हाणांचा प्रयत्न होता का? अशा प्रश्नही उपस्थित झाला होता.
मात्र, अजित पवार यांनी मराठा संघटनांचा रोष वाढत चालल्याने सूरज चव्हाण भेटायला येण्याचीही वाट न पाहता थेट ट्विटरवरुनच त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या. तर सुनील तटकरे यांनी सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली.












Click it and Unblock the Notifications