Badlapur school girl rape case : बदलापुरात बस फोडली, आंदोलकांवर लाठीचार्ज, पोलिसांवर दगडफेक
Badlapur school girl rape case: लहानग्या शालेय मुलीवर शाळेत झालेल्या अत्याचारानंतर बदलापूर रेल्वेस्थानकावर गेल्या सहा तासापासुन आंदोलन सुरु होतं. या आंदोलनातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला असून प्रत्युत्तरात आंदोलकांनीही पोलिसांवर दगडफेक केली आहे. दुसरीकडे बदलापूरमध्ये एक बस फोडण्यात आल्यांचही सुत्रांनी सांगितलं.
आज बदलापूर रेल्वेस्थानकात रेल रोको आंदोलनादरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांची समजूत काढली पण आंदोलक आपल्या भुमिकेवर ठाम होते. त्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यानंतर एकच पळापळ झाली असून दिसेल त्या इमारत, गच्चीवर आंदोलक पोहचले आहेत.

काय म्हणतात रेल्वे पोलिस?
आम्ही ट्रॅक क्लिअर केला असून आम्ही याचा अहवाल रेल्वेला देत असुन तो त्यांना देणे आवश्यक असतं. यासंदर्भात माध्यमांना विस्तारानं माहिती दिली जाईल असंही रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. रेल्वेवाहतूक सुरळीत करणं आवश्यक होतं हेही त्यांनी सांगितल. रेल्वे वाहतूक पुर्वपदावर आणण्याचा प्रयत्न जलदगतीने सुरु करण्यात येत आहे. सुमारे साडेसहा तास हे आंदोलन सुरु होतं.
रेल्वेट्रॅक मोकळा..
बदलापूरच्या आंदोलनामुळे रेल्वेची सेवा विस्कळीत झाली होती. मात्र, आता लाठीचार्जनंतर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. सहाच्या सुमारास लाठीचार्ज झाल्यानंतर आता रेल्वेट्रॅक मोकळा झाला आहे. दरम्यान जखमी पोलिसांना उपचारासाठी पाठवण्यात आले आहेत.
रेल्वे कधी सुरु होणार?
बदलापूर रेल्वेस्थानकात मोठा पोलिस फौजफाटा लावण्यात आला असून येथे फलाटावरील आंदोलक हटवण्यात आले आहेत. आता रेल्वेट्रॅक मोकळा झाल्याचा अहवाल दिल्यानंतर रेल्वेकडून या मार्गावर लोकल सेवा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
एसटी फोडली
एसटी बसची आंदोलकांकडून तोडफोड कऱण्यात आली आहे. यात बसच्या समोरील भागाचे नुकसान झाले असून काच फुटली आहे. दरम्यान शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण शहरात मोठा पोलिस बंदोबस्त असून शहराला छावणीचे स्वरुप आले आहे. दरम्यान संपूर्ण परिस्थितीवर पोलिसांचे नियंत्रण असून रेल्वेपोलिस सर्व परिस्थितीवरही लक्ष ठेऊन आहेत.
पोलिसांच्या वाहनाला केलं लक्ष्य
शहरातील रस्त्यांवर पोलिसांचा बंदोबस्त असून पोलिसांच्या वाहनावर मोठे दगडं मारुन ती फोडण्यात आली. त्यानंतर पोलिसांची गाडी उलटी केली. य गाडीवर पोलिस असे नाव लिहिले असल्याने या वाहनाला पोलिसांनी लक्ष्य केलं आहे. बहुदा ते खाजगी वाहन असल्याचंही सांगण्यात येत आहे. तसंच काही वाहनांनाही आंदोलकांनी लक्ष्य केल्याचंही सांगण्यात येत आहे. या सर्व घडामोडीत काही आंदोलकही जखमी झाले आहेत.












Click it and Unblock the Notifications