लाडक्या बहीणीसाठी योजना, आमचं काय? लाडका किन्नर योजना काढत का नाही- तृतीयपंथीयांचा CM शिंदेंना सवाल
छत्रपती संभाजीनगर : महिलांना अर्धा तिकीट योजना, महिलांसाठी दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार..आता भावांसाठीही राज्य सरकारने योजना काढली पण आमचं काय? आमच्यासाठी काय करणार असा सवाल तृतीयपंथीयांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्र्यांना हा सवाल तृतीयपंथीयांनी केला, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट न झाल्याने नाराजीही व्यक्त केली आहे.

योजना सोडाच.. धमकावले जातेय
'शासनाने लाडकी बहीण योजना काढली, पण आमचं काय हा सवाल तर आहेच पण शहरात आम्हाला धमकावले जात आहे. मग आम्ही पोट कसे भरायचे? आमच्या उदरनिर्वाहाचे काय', असा प्रश्न तृतीयपंथीयांनी राज्य शासन तसेच मुख्यमंत्र्यांसमोर उपस्थित केला. तसंच मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याने नाराजीही व्यक्त केली. मुख्यमंत्री काल एकनाथ शिंदे आंबेडकरी समाजाचा सत्कार स्वीकारण्यासाठी शहरात आले होते. त्यांचे भाषण संपताच तृतीयपंथीयांनी आपली व्यथा मांडली.
जेलमध्ये टाकू असे का म्हणता..
सिग्नलवर थांबू नका, नाही तर तुम्हाला शिक्षा देऊ, जेलमध्ये टाकू, तडीपार करू असे पोलिस आम्हाला सांगतात. यामुळे आम्ही आमची उपजीविका कशी भागवायची? आमचा उदरनिर्वाह कसा चालवायचा? याबाबत आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायचे होते. ही समस्या फक्त छत्रपती संभाजीनरमध्येच नाही तर राज्यात
सर्वत्र आहे. त्यामुळे आमच्यासाठी योजना हवी अशीही तृतीयपंथीयांची मागणी आहे.
आम्ही नागरिक नाही का..?
तृतीयपंथीयांनी स्पष्ट केले की, आम्हाला आमच्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडायच्या होत्या. परंतु आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचू दिले गेले नाही. आम्ही नागरिक नाही का, नागरिक असलो तर सरकारने आमच्यासाठी काय केले, ते आम्हाला ना जगू देत ना मरू देत ! आम्हाला काही हक्क नाहीत का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
लाडका किन्नर योजना काढत का नाही?
लाडका भाऊ, लाडकी बहिण योजना काढली. पण 'लाडका किन्नर योजना काढली का, ही योजना काढून कुणी तृतीयपंथीयाचा आशीर्वाद घेतला का?', शासनाने आम्हाला नोकरी द्यावी, आम्ही झाडण्याचे, पुसण्याचे कामही करू अशा भावनाही तृतीयपंथीयांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे व्यासपीठावरून उतरत असताना तृतीयपंथीयांनी कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला व भेट घेण्याचा आग्रह धरला. मात्र, ते शक्य झाले नाही.












Click it and Unblock the Notifications