मोठी बातमी: 'लाडकी बहीण' योजनेचा 13वा हप्ता रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर खात्यात जमा होणार
राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना पात्र महिलांसाठी एक मोठा आधार ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्याचे 1500 रुपये थेट जमा केले जाणार आहेत.

अदिती तटकरे यांनी दिली माहिती
मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या खास दिवशी जुलै महिन्याचा सन्मान निधी (1500 रुपये) थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.
योजनेसाठी 2984 कोटींची तरतूद
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना महायुती सरकारने जुलै 2024 पासून सुरू केली आहे. या योजनेसाठी 28290 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारने 2984 कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे, येत्या दोन ते तीन दिवसांत हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योजनेचा हा 13वा हप्ता असेल.












Click it and Unblock the Notifications