लाडक्या बहिणींसाठी मोठी दिलासादायक बातमी; जून महिन्याच्या हप्त्याबाबत आदिती तटकरे यांचं स्पष्टीकरण
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेंतर्गत जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. निधीअभावी काहीसा विलंब झाल्यानंतर अखेर सरकारने या महिन्याच्या अनुदानासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. अनुसूचित जाती घटकांसाठी असलेल्या ४१० कोटी ३० लाख रुपयांचा निधी या योजनेसाठी वळवण्यात आला असून, यासंदर्भात शासन निर्णयदेखील नुकताच जारी करण्यात आला आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंबंधीची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केलं की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. उद्यापासून आधार क्रमांक लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये हा निधी जमा होण्यास सुरुवात होईल."
तटकरे यांनी सरकारच्या भूमिकेवर भाष्य करताना सांगितलं की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सशक्त नेतृत्व आणि महिलांचा सरकारवरील विश्वास हे या योजनेचं खऱ्या अर्थाने बळ आहे. ही योजना यापुढेही अशाच प्रकारे भक्कम पायावर उभी राहील याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे."
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू !
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) July 4, 2025
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या… pic.twitter.com/Kkpkf9hRWP
दरम्यान, काही अपात्र लाभार्थींविषयी तपासणीनंतर महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे. सरकारने या योजनेचा गैरफायदा घेतलेल्या २,२८९ महिलांना यादीतून वगळले आहे. यामध्ये बहुतांश महिला सरकारी नोकरीत असलेल्या असल्याचे उघड झाले आहे. महिलाव व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीच विधानसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली आहे.
महायुती सरकारने नोव्हेंबर २०२४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी 'लाडकी बहीण' योजना जुलै २०२४ मध्ये सुरू केली होती. २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत देणारी ही योजना सध्या लाखो महिलांसाठी आधारवड ठरली आहे.












Click it and Unblock the Notifications