मोठी बातमी:कुणाल कामरांची मद्रास हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव! एकनाथ शिंदेंवरील वक्तव्य प्रकरण
Kunal Kamra seeks anticipatory bail : स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी अलीकडे महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कथित वादग्रस्त वक्तव्य आणि कविता तसेच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर कथित वादग्रस्त विनोदी कविता केली होती. महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री यांना'गद्दार'संबोधून रचलेले कथित गाणे जाहीर झाल्यानंतर फआयआर दाखल झाला आहे.
एफआयआर दाखल झाल्यानंतर कुणाल कामरा यांनी अंतरिम जामिनीसाठी त्यांचे अधिकार क्षेत्र असलेल्या मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता या प्रकरणात त्यांना जामिन मिळतो का हे लवकरच कळणार आहे.

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यावर केलेल्या कथित टिप्पणीबद्दल त्याच्याविरुद्ध अनेक एफआयआर दाखल झाले आहेत. कुणाल कामरा हे तामिळनाडूमधील विल्लुपुरम शहरातील कायमचे रहिवासी आहेत
आपल्या सडेतोड आणि स्पष्टवक्तेपणासाठी कुणाल कामरा हे प्रसिद्ध आहेत. यासह व्यंगात्मक, विडंबनात्मक गीत गात त्यांनी सध्याच्या व्यवस्थेवर आपले परखड मत व्यक्त केले आहे. त्यामुळेच त्यांचे लाखो फाॅलोअर आहेत, त्यांचे विचारही अनेकांना रुचतात, तर काहींकडून थेट टीकाही केली जाते.
अपमानास्पद टिप्पणी केल्याचा कामरांवर आरोप
कुणाल कामरा यांनी महाराष्ट्रातील शिवसेनेचे प्रमुख नेते तथा विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप आहे. यानंतर त्यांना कायदेशीर अडचणीचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, त्यानंतर कॉमेडियनने अटकेपासून कायदेशीर संरक्षण मागितले आहे कारण तो आरोपांचा सामना करण्याची तयारी करत आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार. शुक्रवार, 28 मार्च रोजी न्यायमूर्ती सुंदर मोहन यांच्यासमोर हे प्रकरण तातडीने नमूद करण्यासाठी सूचीबद्ध करण्यात आले होते. कुणाल कामरा यांनी अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी शिवसेना आमदार मुराजी पटेल यांनी कामरा यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती, त्यानुसार कामरांवर एफआयआर दाखल करण्यात आला होता. एफआयआर नंतर मुंबईतील खार पोलीस ठाण्यात हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे.
कुणाल कामरा यांना ठार मारण्याच्या धमक्या
कुणाल कामरांच्या कथित वादग्रस्त टिप्पणीनंतर शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि त्यांनी मुंबईतील हॅबीटट स्टुडीओची तोडफोड केली होती. दरम्यान पक्षाच्या सदस्यांनी आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे कारण देत कामराने मुंबईत पोलिसांसमोर हजर होण्यास नकार दिला आणि त्यासाठी एका आठवड्याची मुदत मागितली आहे. दरम्यान आता त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीबद्दल मत व्यक्त केले आणि आपण हिंसाचाराचे समर्थन करत नसल्याचे म्हटले आहे, पण कुणाल कामरा यांचे विनोद चांगले नव्हते असेही त्यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications