कणकवलीतून नितेश राणेंची हॅट्रिक, ठाकरे गटाच्या संदेश पारकरांचा पराभव, राणे बंधूंचा कोकणात बोलबाला
Maharashtra Assembly Election 2024 : माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे विद्यमान खासदार नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक करताना महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा पराभव केला. नितेश राणे यांना 53,893 मतांचे मताधिक्य मिळाले आहे.
कोकणातील राणे बंधुंच्या लढतींकडेही राज्याचं लक्ष लागलं होतं. कारण, यंदा कोकणात आमदार नितेश राणे आणि त्यांचे बंधू व माजी खासदार निलेश राणे दोघेही निवडणुकीच्या रणांगणात आहेत. येथील मतदारसंघात म्हणजेच कणकवली मतदारसंघात नितेश राणे यांनी आघाडी घेतली. तर, दोन्ही राणे बंधुंचा विजय झाला. कुडाळ-मालवण मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे वैभव नाईक यांचा देखील यंदा पराभव झाला. कोकणातील या दोन नेत्यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते, त्यामुळे, सकाळपासूनच येथील मतदारसंघातील निकालावर नजरा खिळून होत्या. अखेर, नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांचाही विजय झाला.

निलेश राणेंनी केला शिंदेसेनेत प्रवेश
विशेष म्हणजे निलेश राणे यांनी निवडणुकांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करुन निवडणूक लढवली होती. अखेर, त्यांनाही येथील मतदारसंघात यश मिळाल्याचं मिळाले. नितेश राणे यांना तब्बल 53 हजार मतांचं मताधिक्य मिळालं आहे. 53,893 मतांनी नितेश राणे विजयी झाल्याने त्यांचा हा मोठा विजय आहे. तर, कुडाळमध्ये नितेश राणे यांना पहिल्या 18 फेरीत 6600 मतांचे मताधिक्य होते. त्यामुळे, त्यांचाही विजयही झाला.
नितेश राणे यांनी 2014 मध्ये राजकारणाचा श्री गणेशा केला. नारायण राणे यांचा सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा कणकवली देवगड वैभववाडी हा मतदारसंघ त्यांनी काँग्रेस पक्षाकडून लढवला. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी भाजपचे प्रमोद जठार यांचा पराभव केला. 2014 साली भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी विरोधी बाकावरून आवाज उठवला. मराठा समाजाचे प्रश्न त्यांनी प्रकर्षाने मांडले. मात्र 2019 साली त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून कणकवलीची जागा 25000 च्या मताधिक्याने जिंकली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे सतीश सावंत यांचा पराभव केला होता. नितेश राणे यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती मात्र भाजपचे सरकार गेले आणि नितेश राणे यांना पुन्हा विरोधी बाकांवर बसावे लागले.
2022 साली महायुतीचे सरकार आल्यानंतर देखील नितेश राणे यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. मात्र भाजपची हिंदुत्ववादाची भूमिका त्यांनी आक्रमकपणे महाराष्ट्रभर नेली. देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांची विधाने वादग्रस्त असतात असा अनेकांचा आरोप आहे. रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना वादग्रस्त विधान बद्दल अटक करावी, अशी मागणी काही संघटनांकडून करण्यात आली होती. मात्र नितेश राणे हे हिंदुत्वाचे काम करीत आहेत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे समर्थन केले.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत संदेश पारकर यांचा सामना त्यांनी केला. संदेश पारकर हे भाजपमधून काही महिन्यांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. संदेश पारकर हे नितेश राणे यांचे वडील नारायण राणे यांचेही एकेकाळी प्रतिस्पर्धी होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात किंबहुना कोकणच्या राजकारणात नारायण राणे विरुद्ध संदेश पारकर हा संघर्ष कित्येक वर्षे रंगला होता. मात्र नंतर संदेश पारकर यांनी नारायण राणे यांच्याशी जुळवून घेतले. पण नितेश राणे यांच्याशी मतभेद झाल्यामुळे संदेश पारकर यांनी पुन्हा वेगळी वाट निवडली.
नितेश राणे आक्रमक नेता
आपल्या आमदारकीच्या दोन कार्यकाळात नितेश राणे यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. मच्छिमार बांधवांसाठी मत्स्य अधिकाऱ्यांवर केलेले बांगडा फेक आंदोलन असो किंवा मुंबई गोवा महामार्गाच्या कामकाजात होत असलेल्या ढिलाईच्या विरोधात अभियंत्यावर चिखल फेक करणे असो. नितेश राणे यांनी आक्रमक आमदार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे आणि त्यात तिसऱ्या वेळी विधिमंडळात प्रवेश करीत आहेत.












Click it and Unblock the Notifications