Prashant koratkar : प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर करताना कोर्टाने काय ठेवल्या सशर्त अटी, वाचा सविस्तर
Prashant koratkar Latest News : छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
प्रशांत कोरटकर 5 दिवस पोलिस कोठडीत आणि 10 दिवस न्यायालयीन कोठडीत होता. 30 मार्च रोजी कोल्हापूर कनिष्ट न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
दरम्यान, कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं त्याचा जामीन अखेर मंजूर केला. दरम्यान, जामीन मंजूर करताना कोर्टाने काही सशर्त अटी देखील लावल्या आहेत. त्या कोणत्या वाचा सविस्तर..!

नागपूरच्या प्रशांत कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना कॉल करुन धमकी दिली होती. तसेच त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर इंद्रजीत सावंत यांनी कोल्हापूरमध्ये कोरटकर विरोधात तक्रार नोंद केली होती.
वकील असीम सरोदे यांनी काय सांगितलं!
या प्रकरणाची आज कोर्टात सुनावणी झाली. यावेळी इंद्रजित सावंत यांचे वकील असिम सरोदे यांनी बाजू मांडली. परंतु, कोर्टाने तांत्रिकदृष्ट्या कोरटकरला जामीन मंजुर केला. ते म्हणाले की, ज्या कलमांच्या आधारे प्रशांत कोरटकरवर गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यामध्ये तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा नव्हती. त्यामुळे तांत्रिक गोष्टींचा आधार घेत त्याला जामीन मंजूर होणं हे सहाजिकच आहे.
न्यायधीशांनी वक्तव्याची व्याप्ती लक्षात घ्यायला हवी होती
पुढे बोलताना वकील असीम सरोदे म्हणाले की, प्रशांत कोरटकरने जे वक्तव्य केलं त्याची व्याप्ती न्यायाधीशांनी लक्षात घ्यायला हवी होती आणि त्याला जामीन द्यायला नको होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण झालं नाही असं लेखी दिलं होतं. तरीही कोरटकरला जामीन देण्यात आला. आता जर अटींचे उल्लंघन केले तर जामीन रद्द साठी आमचा प्रयत्न करणार आहोत, असेही सरोदे यांनी सांगितलं.
या प्रमुख अटींवर कोर्टाने केला जामीन मंजूर
अटी व शर्तीवर त्याला जामीन मंजूर झाला आहे. कोरटकरला पन्नास हजार रुपयांचा जात मुचलका, तपासासाठी ज्या ज्या वेळी पोलीस बोलावतील त्या त्यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हजर राहणे, फिर्यादी आणि साक्षीदार यांना धमकवायचं नाही अशा या प्रमुख तीन अटींवर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
नेमकं कोरटकर प्रकरण काय आहे?
- प्रशांत कोरटकर संदर्भात नेमकं प्रकरण काय आहे, यावरही आपण एक नजर टाकणार आहोत. 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजून 8 मिनिटांनी कोरटकरने इंद्रजित सावंतांना फोन केला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत सावंतांना धमकी दिली होती.
- 25 फेब्रुवारीला इंद्रजित सावंत यांच्या तक्रारीवरून कोल्हापूरच्या राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
- कोरटकरनं 27 फेब्रुवारीला एक व्हिडीओ तयार करून माफी मागण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी प्रशांत कोरटकर एक महिन्याहून अधिक काळ फरार होता.
- कोल्हापूर पोलिसांनी त्याला तेलंगणामधून अटक केली. त्यानंतर कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याला आधी पाच दिवसांची पोलिस कोठडी आणि नंतर 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
- त्यानंतर त्याला पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications