नाशिक शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाला धक्का, शिंदेंच्या उमेदवाराने मारली बाजी
नाशिक: नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २६ जून रोजी मतदान पार पडले होते. या निवडणुकीच्या मतमोजणीला १ जुलै सकाळपासून सुरूवात झाली होती. तब्बल २४ तासानंतर नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल हाती आलेला आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघात महाविकाआघाडी म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून संदीप गुळवे, शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे असा तिरंगी सामना रंगला होता.

किशोर दराडे यांना सर्वाधिक मतं मिळाली असून त्यांनी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे, उद्धव ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांचा पराभव केला. संदीप गुळवे हे सुरुवातीपासूनच पिछाडीवर पडले होते. मध्यंतरी गुळवे यांनी आघाडी घेतली. त्यामुळे निवडणूक अटीतटीची झाली होती. मात्र, त्यानंतर किशोर दराडे यांनी मोठी आघाडी घेतली.
पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत किशोर दराडे आघाडीवर होते. तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि किशोर दराडे यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत होतं. पण, अखेर किशोर दराडेंनी विजय मिळवला.
कोकण पदवीधरमधून निरजंन डावखरेंची विजयाची हॅट्रीक
कोकण पदवीधर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी सलग तिसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांचा पराभव करत निरंजन डावखरे यांनी विजयाची हॅट्रीक पूर्ण केली आहे.
कोकणातील पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी सलग तिसऱ्यांदा दाखविलेल्या विश्वासाबद्दल आपण त्यांचा आभार मानतो अशी प्रतिक्रिया निरंजन डावखरे यांनी दिली. याबाबत सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केली आहे. महायुतीचे कोकणातील सर्व पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते यांनी अथक मेहनत घेतल्यामुळेच महायुतीला यश मिळविता आल्याच डावखरे यांनी म्हटलं आहे.
मुंबईत ठाकरेंचाच बोलबाला
मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांचा 44 हजार मतांनी विजय झाला आहे. मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात मुख्य लढत होती.
अनिल परब यांना आतापर्यंत 44,791 मते मिळवून विजयी होण्यासाठी मतांचा कोटा पूर्ण केला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपच्या किरण शेलार यांना 18,771 मते मिळाली असून अनिल परब यांचा 44 हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जल्लोषाला सुरुवात झाली आहे.












Click it and Unblock the Notifications