मोठी बातमी : खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिश्नोई गँगकडून धमकी; हरिण मारल्यामुळे केली 'ही' मागणी
बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील बावी गावातील बाप-लेकास मारहाण केल्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्या चर्चेत आला. तो आ. सुरेश धस यांच्या कार्यकर्त्या असल्याचे सांगण्यात आल्याने चर्चा वाढली. आता याच खोक्याच्या दहशतीचे व त्याच्या कमाईचे रोज नवनवे व्हिडीओ समोर येत आहे. वन्यप्राण्यांना मारुन खोक्याने लाखोंची कमाई केल्याचे सांगितले जात आहे. आता याच खोक्याला लाँरेन्स बिश्नोई गँगने धमकी दिल्याने चर्चा वाढली आहे. आता ही धमकी खरंच बिश्नोई गँगने दिलीय, की बिश्नोई गँगच्या नावाखाली दुसऱ्या कुणी दिली, याचा शोध घेतला जात आहे.

नेमके काय आहे प्रकरण?
बीड पोलीस आणि वनविभागाच्या पथकाकडून आज खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घराची झाडाडडती घेतली. त्याच्या घरामध्ये जनावरांचं सुकलेलं मांस आणि शिकारीसाठी वापरण्यात येणारं साहित्य, फासे वगेरे ताब्यात घेण्यात आले. हे प्रकरण आज दिवसभर चर्चेत असतानाच एक मोठी बातमी समोर आली. सतीश भोसले उर्फ खोक्याला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करून धमकी देण्यात आली आहे.
काय म्हटले धमकीमध्ये?
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करून सतीश भोसले याला धमकी देण्यात आली आहे. बिश्नोईच्या नावाने एका अज्ञात व्यक्तीने दोन दिवसांपूर्वी एक फेसबुक अकाउंट तयार करण्यात आले. या फेसबुक अकाउंटवरून खोक्या उर्फ सतीश भोसले याला धमकी देण्यात आली. खोक्याला लवकरात लवकर जेलमध्ये टाका, अशी मागणी या अकाउंटवरून करण्यात आली आहे. हरिण आमचं दैवत आहे, त्यामुळे खोक्या माफीच्या लायकीचा नाही, असं या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
खोक्या कसा आला चर्चेत
शिरूर तालुक्यातील बावी गावचे रहिवासी असलेल्या बाप-लेकाला बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणानंतर खोक्या चर्चेत आला. या मारहाणीत वडील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे हे गंभीर जखमी झाले होते. खोक्याने ढाकणे यांच्या शेतात हरिणाची शिकार करण्यासाठी जाळे लावले होते. या जाळ्यात एक हरिण अडकलं, त्याला वाचवण्यासाठी ढाकणे कुटुंब समोर आले. त्यानंतर खोक्याने या बाप-लेकाला जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये महेश ढकणे याचे दात पडले. तर वडील दिलीप ढाकणे यांच्या फासोळ्या मोडल्या. या मारहाणीमध्ये वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.
उद्या शिरुर बंदची हाक
खोक्याची या परिसरात दहशत असल्याचे सांगितले जात आहे. खोक्या हा आ. सुरेश धस यांना हरिणाचे मटन देतो, असा गंभीर आरोप ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेत केला. वाल्मिक कराडपेक्षा खोक्यावर जास्त गुन्हे दाखल असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात आता येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून, त्यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. तसेच उद्या शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे. खोक्या अजूनही पोलिसांच्या हाती कसा लागला नाही? असा सवला येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.












Click it and Unblock the Notifications