6 महिन्यात धनंजय मुंडेंची आमदारकी जाईल, या महिलेचा दावा,म्हणाल्या - मुंडेंच्या दलालांनी षडयंत्र...
Dhananjay Munde Vs Karuna Sharma : ज्या दिवशी धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईल त्या दिवशी मोठा विजय असेल. पुढच्या सहा महिन्यात त्यांची आमदारकी जाणार हे नक्की आहे, असा दावा करुणा शर्मा यांनी केला.
माझगाव कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि धनंजय मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली. त्यानंतर करुणा शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी धनंजय मुंडें यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला.
करुणा शर्मा म्हणाल्या की, समोर मंत्री असो वा कितीही ताकदवान व्यक्ती असो, आपली बाजू सत्याची असेल तर त्याचा विजय होतोच. न्यायालयाने दिलेला निकाल हा सर्व पीडित महिलांसाठी ऐतिहासिक असाच आहे अशी पहिली प्रतिक्रिया करुणा शर्मा यांनी दिली.
आमदारकी घालूनच शांत बसेल
आता धनंजय मुंडेंची आमदारकी घालवूनच शांत बसेन, तो मोठा विजय असेल असंही त्या म्हणाल्या. धनंजय मुंडे यांचे हे डोकं नसून त्यांच्या आजूबाजूच्या दलालांनी आपल्याविरोधात कारस्थान रचल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला.

करुणा शर्मा या आपल्या पत्नी नाहीत असं सांगत आमदार धनंजय मुंडे यांनी वांद्रे कुटुंब न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिलं होतं. त्यावर करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंच अंतिम इच्छापत्र आणि स्वीकृती पत्र हे दोन महत्त्वाचे पुरावे दाखल केले. त्या आधारे न्यायालयाने करुणा शर्मा यांना दिलासा देत त्यांना देण्यात येणारी पोटगी कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे.
प्रत्येक महिलेने लढा दिला पाहिजे
न्यायालयाच्या निकालानंतर करुणा शर्मा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, "महिलांसाठी हा निकाल ऐतिहासिक आहे. महिला या असा लढा देताना हतबल होतात. मी देखील अनेकदा हतबल झाले, रडले. पण आपली बाजू सत्याची असेल तर आपण लढलं पाहिजे, न्याय मिळतोच. या निकालाने महिलांना एक नवा मार्ग दिसला आहे. अशा अनेक महिला आहेत ज्यांच्यावर अन्याय होत आहे. पण माझ्यासारख्या एका साधारण महिलेने एका मंत्र्याला हरवलं आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेने लढावं असं माझं आवाहन आहे."
पहिली बायको असल्याचं दुसऱ्यांदा सिद्ध
करुणा शर्मा म्हणाल्या की, धनंजय मुंडेंची पहिली बायको मीच आहे, हे न्यायालयात दुसऱ्यांदा सिद्ध झालं आहे. 1998 पासून आतापर्यंत 27 वर्षे मी धनंजय मुंडे यांच्यासाठी दिले आहेत.
त्यामुळे आता माझा हक्क म्हणून मला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी होती. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारेच हा निकाल देण्यात आला आहे.
काही युवकांना 20 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप
धनंजय मुंडेंनी हे प्रकरण दडपण्यासाठी माझ्या मागे काही युवकांना सोडलं होतं. मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी 20 कोटींची ऑफर देण्यात आली आहे. त्याचेही माझ्याकडे पुरावे आहेत असंही करुणा शर्मा म्हणाल्या.












Click it and Unblock the Notifications