कर्जत-जामखेडची गणिते बदलतील..? अजित पवार गटाची मतदारसंघात एन्ट्री! आता सामना पवार विरुद्ध पवार? वाचा
Karjat Jamkhed Assembly Constituency Politics : कर्जत-जामखेड या दुष्काळी तालुक्यात यंदाची विधानसभा गाजण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाच्या रोहित पवारांविरुद्ध भाजपचे प्राध्यापक राम शिंदे अशाच फाईटची चर्चा असली तरी, यंदा अजित पवार गटाच्या तालुक्यातील एन्ट्रीने रंगत वाढली आहे.
अजितदादा गटाने अचानक मारलेली मुसंडी या तालुक्याची गणिते नक्कीच बदलू शकते. अजित पवारांविरुद्ध रोहित पवार हा वाद पाहता यावेळी भाजपऐवजी नव्या व जुन्या राष्ट्रवादीतच लढत होण्याची चिन्हे आहेत. त्यातच महाविकास अघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व ठाकरे गटाने रोहित पवारांच्या उमेदवारीला विरोध केल्याने बंडखोरीची शक्यताही वाढली आहे. हे सगळं पाहता रोहित पवारांना ही निवडणूक यंदा सोप्पी नसल्याचं दिसतंय...

गेल्यावेळी राष्ट्रवादीची मुसंडी
कर्जत व जामखेड हे दोन्ही तालुके दुष्काळी. गेल्यावेळी राष्ट्रवादी एकत्र असताना रोहित पवारांनी बारामतीवरुन येऊन विद्यमान मंत्री असणाऱ्या राम शिंदेंचा धक्कादायक पराभव केला. भाजपची 25 वर्षांची सत्ता राष्ट्रवादीने हिसकावली. हा शिंदेंसाठीच नाही, तर भाजपसाठीही मोठा धक्का होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांचे खास असलेल्या राम शिंदेंना विधानपरिषदेवर घेऊन भाजपने त्यांचं पुनर्वसन केलं.
आता हे दोघे आमदार असल्याने विकासकामे, एमआयडीसी, रस्ते आदी मुद्यांवरुन या दोघांतला वाद कमी होण्याऐवजी विकोपाला गेला. गेल्या पाच वर्षांत रोहित पवारांनी तालुक्यात जम बसवला, तर राम शिंदेंनीही कोट्यवधींचा विकासनिधी आणला.
विधानसभेला अजित पवारांचीच चर्चा
अजित पवारांनी बारामतीतून निवडणूक लढविणार नसल्याची अप्रत्यक्ष घोषणा गेल्या आठवड्यात केली. तेथे त्यांच्या जागी त्यांचा मुलगा जय पवारच्या नावाची चर्चा आहे. दुसरीकडे रोहित पवारांनी लोकसभेला शरद पवार गटाची धुरा सांभाळून सुप्रिया सुळेंच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. सुनेत्रा पवारांचा पराभव, अजितदादांच्या अजूनही पचनी पडलेला नाही. त्यामुळे रोहित पवारांच्या पराभवासाठी अजित पवार कर्जत-जामखेडमधून लढण्याची शक्यता वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांसह त्यांच्या गटातील नेत्यांची वाढलेली उठबस पाहता, या शक्यता वाढत आहेत. कर्जत तालुक्यात अजितदादांचा अंबालिका साखर कारखाना आहे. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांशी त्यांची जुळलेली नाळ पाहता, ते येथून सहज विजयी होऊ शकतात असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे.

राम शिंदेंच्या तिकीटाबाबत संदीग्धता
राम शिंदे हे विधानपरिषदेवर 2028 पर्यंत आमदार आहेत. त्यामुळे भाजप त्यांना पुन्हा तिकीट देईल का, ही शंका आहे. शिंदे वगळता भाजपकडे या तालुक्यात दुसरा मोठा नेताही सध्यातरी नाही. त्यामुळे ही जागा अजित पवार गटाला जाण्याच्या शक्यता राजकीय विश्लेषक मांडतात. बारामतीत केलेला पवार विरुद्ध पवार हा प्रयोग भाजप कर्जत-जामखेडमध्येही करु शकतो. अजित पवारांशिवाय या मतदारसंघात त्यांचे पुत्र जय पवार, अंबादास पिसाळ, राजेंद्र गुंड, प्रवीण घुले आदींची नावेही चर्चेत आहेत.
मराठा-ओबीसी कार्ड महत्त्वाचं
कर्जत-जामखेड मतदारसंघात गेल्यावेळी मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत झाली. त्यात मराठा कार्ड हातात धरून रोहित पवारांनी बाजी मारली. कर्जत तालुक्यात माळी व धनगर तर जामखेड तालुक्यात वंजारी मतांची संख्या लक्षणीय आहे. राम शिंदे स्वतः धनगर समाजाचे नेते आहे. गेल्यावेळी त्यांच्याकडून ओबीसी मतांची बेरीज करणं चुकलं. मात्र यावेळी ते हे गणित सोडवतील. मात्र त्यांच्याव्यतिरीक्त महायुतीने इतर कुणीही इच्छुक उमेदवार शोधला तर मराठा विरुद्ध मराठा अशीच लढत होईल. त्यावेळी ओबीसी मतांवरच आमदार ठरवला जाईल. मंत्री विखे गट, आ. शिंदे गट यांना हाताशी धरल्याशिवाय या मतदारसंघात ओबीसी गणित जुळत नाही, असा इतिहास आहे.
'या' प्रश्नांवर गाजणार निवडणूक
Karjat Jamkhed Assembly Constituency Politics : कर्जत व जामखेड हे दोन्ही तालुके दुष्काळी आहे. दरवर्षी शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा येथे गंभीर प्रश्न असतो. कुकडी व सीना कालव्यांवरच या दोन्ही तालुक्यांना अवलंबून रहावे लागते. मात्र दरवर्षी या आवर्तनाचे नियोजन कोलमडते. शिवाय हाताला काम मिळण्यासाठी एमआयडीसीचा मुद्दाही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहे. एमआयडीसी मंजूर झाली असली तरी पवार-शिंदे वादात ती अडकलेली आहे. यावर्षीही याच मुद्द्यावर राजकारण होणार आहे. याशिवाय वाड्यावस्त्यांवरील रस्ते, आरोग्य सुविधा या प्रश्नांवरही यंदा गरमागरमी होण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications