संतापजनक, लाथ मारली, केस ओढले; मुजोरपरप्रांतीय तरुणाची मराठी तरुणीला बेदम मारहाण
कल्याण येथील नांदिवली परिसरात एका खाजगी रुग्णालयात एका मराठी तरुणीला बेदम मारहाण झाल्याची गंभीर घटना घडली आहे. रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या या तरुणीला, डॉक्टरांची मिटींग सुरू असल्याने थोडा वेळ थांबायला सांगितल्याच्या रागातून एका तरुणाने लाथांनी मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मानपाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना २१ जुलैच्या सायंकाळी 'श्री बाल चिकित्सालय' या खाजगी क्लिनिकमध्ये घडली. संबंधित रिसेप्शनिस्ट तरुणीने एका तरुणाला डॉक्टरांकडे सध्या एमआर (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह) बसले असून, त्यांना नंतर भेटता येईल असे सांगितले. यावर तो तरुण संतप्त झाला. त्याचे नाव गौरव झा असून, त्याने रागाच्या भरात तरुणीला थेट लाथेने मारले आणि तिला ढकलून दिले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दृश्य स्पष्टपणे दिसत आहे. असेही म्हटले जात आहे की, मारहाण करणारा तरुण नशेत धुंद होता. डॉक्टरांच्या स्पष्ट आदेशानुसार, तरुणीने त्याला केबिनमध्ये प्रवेश नाकारला होता. नियमांचे पालन करत असताना, त्याने जबरदस्तीने आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला अडवण्याचा प्रयत्न करताच, त्याने मागे पळत येऊन तिच्या तोंडावर लाथ मारली, ज्यामुळे ती खाली कोसळली. तरीही त्याने तिच्यावर लाथाबुक्क्यांचा भयंकर मारा केला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
डॉक्टरेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कल्याणमधील या प्रकारामुळे डॉक्टरेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. फक्त डॉक्टरांची मिटींग चालू आहे, एवढे सांगितल्याने तरुणाने इतकी टोकाची प्रतिक्रिया का दिली, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना घडण्यापूर्वी त्यांच्यात काही शाब्दिक वाद झाला होता का, याचा तपासही पोलीस करत आहेत. मात्र, कोणताही वाद असला तरी, एका महिलेवर अशा प्रकारे हल्ला करणे अत्यंत चुकीचे असून, या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
रुग्णालयातील मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ
रुग्णालयात रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या अनेक घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी डॉक्टर आणि डॉक्टरेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष कायदाही करण्यात आला आहे. असे असतानाही, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले थांबलेले नाहीत. गौरव झा विरोधात मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीसंनी मारहाण करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.












Click it and Unblock the Notifications