कल्याण हादरले: इंस्टाग्रामवरील मैत्रीचा गैरफायदा; अल्पवयीन मुलीवर 7 नराधमांचा सामूहिक बलात्कार!
Kalyan crime News : सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून तिच्यावर अत्याचार केल्याची एक धक्कादायक आणि संतापजनक घटना कल्याण शहरात उघडकीस आली आहे. इंस्टाग्रामवर मैत्री करून व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत तब्बल सात नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर पाच महिने सामूहिक बलात्कार केला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.

व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंगचा कट
कल्याणमधील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीसोबत एप्रिल महिन्यात राहुल भोईर नावाच्या तरुणाने इंस्टाग्रामवर मैत्री केली.
मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्याचे भासवून त्याने मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याचा अश्लील व्हिडिओ तयार केला. त्यानंतर राहुलने तो व्हिडिओ देवा पाटील या दुसऱ्या तरुणाला पाठवला.
देवा पाटीलने तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्या मुलीवर बलात्कार केला. यानंतर, देवा पाटीलने तो व्हिडिओ अजित सुरवसे, गौरव सुरवसे, हर्षल पोळसे, जयेश मोरे आणि किरण सुरवसे या त्याच्या इतर मित्रांना पाठवला.
या सातही जणांनी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तब्बल पाच महिने त्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सत्य उघड
ही अल्पवयीन मुलगी गेल्या पाच महिन्यांपासून मानसिक तणावात होती, पण कुटुंबीयांनी विचारल्यावर ती काहीही सांगत नव्हती. मात्र, जेव्हा तिचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा हे सत्य समोर आले.
मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सातही आरोपींना बेड्या ठोकल्या. हे सर्व आरोपी मुरबाड आणि भिवंडी परिसरातील असून, धनाढ्य कुटुंबातील असल्याची माहिती आहे.
पोलीस कोठडी
पोलिसांनी सातही नराधमांना पोक्सो (POCSO) विशेष न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने या गंभीर गुन्ह्याची दखल घेऊन सातही आरोपींना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर होणारी मैत्री आणि त्यातून निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.












Click it and Unblock the Notifications