काँग्रेसचे फुटलेले 'ते' आठ आमदार नेमके कोण..? वाचा आमच्या शक्यता
मुंबई : विधान परिषद निवडणुकीत इतरांच्या अपेक्षेप्रमाणे काँग्रेसची मते फुटली. निवडणुकीनंतर ते स्पष्ट झालं. त्यातच मतदान होण्यापूर्वी काँग्रेसचेच आमदार कैलास गोरंट्याल यांनीही आमची चार मते फुटणार, असं म्हणून सकाळीच बॉम्ब टाकला होता. एवढंच नाही तर आपल्या खास शैलीत त्या चार जणांना सांकेतिक भाषेत उघडही पाडलं होतं. आता गोरंट्याल म्हणतात, ते चार जण व इतर चार जण कोण? व नेमकी कुणाची मतं फुटली या चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

आ. गोरंट्याल यांनी काँग्रेसची 4 मतं फुटणार असं सांगितलं होतं. कुणाचा बाप राष्ट्रवादीत गेलेला, कुणाचा नवरा राष्ट्रवादीत आहे, एक टोपीवाला कधी इकडे असतो, कधी तिकडे असतो, आणि एक नांदेडवाला असे चार संकेत गोरंट्याल यांनी दिले होते. झालंही तसंच. प्रत्यक्ष निकाल लागल्यानंतर अजित पवार गटाला व शिंदे गटालाही अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली. त्यानुसार काँग्रेसच्या आठ जणांनी क्राँस व्होटींग केलं, हे स्पष्ट झालं.
काँग्रेसकडे पुरेशा आमदारांचा संख्याबळ असल्यामुळे प्रज्ञा सातव यांचा विजय निश्चित होता. पण मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचं भवितव्य काँग्रेसच्या मतांवर ठरणार होतं. मात्र तसं झालं नाही. कैलास गोरंट्याल यांनी सांगितलेल्या कोडवर्डनुसार त्या चार आमदारांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला.
कुणाचा बाप राष्ट्रवादीत...
पहिला कोड होता. कुणाचा बाप राष्ट्रवादीत गेला. यानुसार पहिलंच नाव चर्चेत आलं झिशान सिद्दीकी यांचं. झिशान यांचे वडिल बाबा सिद्दीकी हे नुकतेच अजित पवार गटात गेले आहेत. शिवाय झिशान काँग्रेसच्या बैठकीलाही उपस्थित नव्हते. त्यामुळे संशयाची सुई त्यांच्यावर आली.
कुणाचा नवरा राष्ट्रवादीत
दुसरा कोड होता, कुणाचा नवरा राष्ट्रवादीत आहे. त्यावरुन आ. सुलभा खोडके यांचं नाव चर्चेत आलं. सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. शरद पवार गटात फूट पडल्यानंतर ते अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे सुलभा खोडकेंचं मतं फुटलं असेल अशा शंका येऊ लागल्या.
एक 'टोपी'वाला कोण?
तिसरा कोड होता एक टोपीवाला.. कधी इकडे कधी तिकडे असतो. टोपीवाला म्हटल्यावर सगळ्यांचं लक्ष गेलं हिरामण खोसकर यांच्याकडे. हिरामण खोसकर हे नाशिक जिल्ह्यात काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. हिरामण खोसकरांचे अजितदादांसोबत जवळचे संबंध आहेत. लोकसभा निवडणुकीला हिंगोलीची जागा मिळावी म्हणून त्यांनी शरद पवारांचीही भेट घेतली होती. त्यामुळेच गोरंट्याल यांच्या संकेतीक शब्दावरुन कधी इकडे तर कधी तिकडे असणारे आमदार, खोसकरच आहेत अशा चर्चा रंगल्या.
नांदेडवाला आमदार कोण?
चौथा कोड होता एक नांदेडवाला. नांदेडवाला म्हटल्यावर आमदार जितेंद्र अंतापूरकर संशयाच्या भोवऱ्यात आले. जितेंद्र अंतापूरकर हे अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय मानले जातात.अशोक चव्हाण यांच्यानंतर अंतापूरकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती.
आता गोरंट्याल यांच्या चार सांकेतीक विधानांवरुन चारजणांवर संशयाची सुई आली. मात्र काँग्रेसची आठ मतं फुटल्याच्या चर्चा होत्या. झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, जितेश अंतापूरकर, हिरामण खोसकर यांच्यासह अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्ती म्हणून शिरीष चौधरी व मोहन हिंबर्डे यांचीही नावे चर्चेत आली. दरम्यान या आमदारांसाठी आम्ही ट्रॅप लावला होता. त्यात ते फसले असा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या सर्वांची पक्षातून हाकालपट्टी केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.












Click it and Unblock the Notifications