शिंदेंचं सोलापूर 'कार्ड' अन् आंबेडकरी चेहऱ्याला संधी; राज्यसभेत ज्योती वाघमारेंना संधी, वाचा सविस्तर
Jyoti Waghmare Named Rajya Sabha Candidate by Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेच्या सात जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी धक्कातंत्राचा वापर करत सोलापूरच्या प्रा. ज्योती वाघमारे यांची उमेदवारी जाहीर केली.
सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या वाघमारेंना संधी देऊन शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा जपल्याचे मानले जात आहे. यामुळे सोलापुरातून राज्यसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या तिसऱ्या नेत्या ठरल्या आहेत.

राज्यसभेच्या सात जागांसाठी भाजपने चार नावे घोषित केली होती, राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवार, तर महाविकास आघाडीने शरद पवारांचे नाव निश्चित केले. शिवसेनेच्या उमेदवारावर त्यामुळे सर्वांचे लक्ष होते. सेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे आणि राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची नावे चर्चेत होती. सात उमेदवारांनी अर्ज भरल्याने निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
आंबेडकरी चळवळीतून आलेल्या प्रा. ज्योती वाघमारे यांचे वडील नगरसेवक होते. त्या मूळच्या तेलगू भाषिक असल्या तरी इंग्रजीमध्ये पीएचडीधारक असून, मराठीवरही त्यांचे चांगले प्रभुत्व आहे. सोलापुरातील प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन त्यांनी राजकारणात सक्रिय प्रवेश केला.
२०१४ मध्ये सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी असलेल्या वाघमारे नंतर काही काळ राजकारणापासून दूर होत्या. २०२२ मध्ये शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर, त्यांच्या आक्रमक वक्तृत्व शैलीमुळे त्यांना राज्याच्या प्रवक्त्या म्हणून नेमले गेले. आता शिंदेंनी त्यांना राज्यसभेची संधी दिली आहे.
ज्योती वाघमारे यांच्या रूपाने सोलापूर जिल्ह्याला राज्यसभेत प्रतिनिधित्व करण्याची तिसरी संधी लाभली आहे. यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी दोन वेळा राज्यसभेचे खासदार म्हणून काम पाहिले. १९९२-१९९८ आणि २००६ मध्ये ते महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले होते.
शिंदेंनंतर, सोलापूरच्या मोहिते पाटील घराण्यातील रणजितसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेची संधी दिली. २००९ मध्ये सुप्रिया सुळे बारामतीतून लोकसभेवर निवडून गेल्यावर रिक्त जागेवर त्यांना उमेदवारी मिळाली. त्यांनी २००९ ते २०१२ या तीन वर्षांत राज्यसभेचे खासदार म्हणून काम पाहिले.












Click it and Unblock the Notifications