तैमूर नाव, धार्मिक कट्टरतावाद.. सैफवरील हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटमुळे खळबळ
अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्री चाकूहल्ला झाला. या हल्ल्यानंतर त्याच्यावर तातडीने लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. या हल्ल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत गुन्हे शाखेच्या ८ तर पोलिसांची ७, अशी पंधरा पथके तयार करत तपास सुरु केलाय. मात्र आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या एका ट्विटमुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.

आव्हाडांना 'ही' शंका
या घटनेनंतर राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सैफवर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याची शंका उपस्थित केली आहे. आव्हाडांनी आपल्या सोशल मिडिया प्लॅटफाँर्म एक्सवर यासंबंधीची पोस्ट केली आहे.
सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पुर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो.गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव *#तैमुर* ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते.ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे ? या दिशेने ही तपास होणे… pic.twitter.com/9atYhziAtl
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 16, 2025
आव्हाडांचं म्हणणं काय?
एक्सवर आव्हाड म्हणालेत, "सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पुर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो.गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते. ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे? या दिशेने ही तपास होणे आवश्यक आहे. कारण सैफ अली खान यांच्यावर एकूण सहा वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर येत आहे. त्यातील दोन वार हे गंभीर स्वरुपाचे असल्याचे समजते. एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या मनक्यावर गंभीर दुखापत झाली आहे".
उद्देश जिवे मारण्याचा?
सैफ अली खानवर झालेला हल्ला पाहता व वार करण्याची पद्धत पाहता हा हल्ला जिवे मारण्याच्या हेतूनेच केला असावा, अशी शंकाही आव्हाडांनी व्यक्त केली. भारतातील चौथ्या क्रमांकाचा मानाचा पद्मश्री सन्मान मिळालेल्या अभिनेत्यावर हा हल्ला होणे म्हणजे विशेष आहे, असंही आव्हाडांनी म्हटलं आहे. आव्हाडांच्या या सर्व शंका पाहता या प्रकरणाता आता नवा ट्विस्ट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications