विधानसभेत मंत्री जयकुमार गोरे भावूक; संजय राऊत, रोहित पवारांविरोधात आणला हक्कभंग प्रस्ताव
राज्याचा मंत्री एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो. त्या महिलेला त्रास देतो, असा गंभीर आरोप काल शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला होता. मंत्री जयकुमार गोरे यांचे त्यांनी थेट नाव घेतले होते. त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केले होते. या टीकेला जयकुमार गोरे यांनी आज विधीमंडळातून उत्तर दिलं. जयकुमार गोरे यांनी संजय राऊत व रोहित पवार यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे. विधानसभा अध्यक्षांनी तो प्रस्ताव स्वीकारून हक्कभंग समितीकडे पाठवला आहे.

नेमकं काय होतं प्रकरण?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मंत्री जयकुमार गोरे यांचे नाव घेऊन गंभीर आरोप केला होता. मंत्री गोरे यांनी एका महिलेला त्यांचे विवस्त्र फोटो पाठविल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनीही गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
मंत्री गोरे काय म्हणाले?
या आरोपावर आज मंत्री जयकुमार गोरे यांनी विधीमंडळात उत्तर दिले. ते म्हणाले, "सातारा न्यायालयातील २०१७ मधील एका प्रकरणाचा उल्लेख करत संजय राऊत यांनी माझ्याबद्दल प्रसारमाध्यमांसमोर बिनबुडाचे व अश्लाग्य असे आरोप केले. त्यानंतर मला सर्वांच्या टीकेला उत्तर द्यावं लागलं. आज विधिमंडळाच्या कामकाजावर परिणाम व्हावा यासाठी जाणीवपूर्वक ते कृत्य केलं गेलं. परंतु, मला या सभागृहाला सांगायचं आहे की २०१७ मधील त्या प्रकरणाचा निकाल २०१९ मध्ये लागला. न्यायालयाने त्या प्रकरणात माझी निर्दोष मुक्तता केली आहे. तसेच न्यायालयाने त्या प्रकरणाशी संबंधित मुद्देमाल नष्ट केला आहे. तरी देखील संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन जाणीवपूर्वक माझी बदनामी केली. त्यांनी माझा व सभागृहाचा विशेषाधिकार भंग केला आहे. न्यायालयाचा अपमान केला आहे, या सभागृहाचा अवमान केला आहे. त्यामुळे मी त्यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडत आहे."
पवारांविरोधातही हक्कभंगाचा प्रस्ताव
मंत्री गोरे यांनी रोहित पवारांवरील आरोपाबाबतही उत्तर दिलं. ते म्हणाले, "आमदार रोहित पवार यांनी देखील सभागृहाच्या बाहेर अधिवेशन चालू असताना याच प्रकरणावरून माझ्यावर वेगवेगळे बेछुट आरोप केले. त्यामुळे मी त्यांच्याविरोधात देखील हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. माझ्यावर, माझ्या कुटुंबाच्या, पक्षाच्या, पक्ष नेतृत्वाच्या बदनामीसाठी खालच्या पातळीवर टीका करण्याचं काम राऊत व रोहित पवार यांनी केलं आहे.
त्या चॅनलविरोधातही भाष्य
एका यू-ट्युब चॅनलने माझ्याविरोधात ८७ व्हिडीओ क्लिप बनवल्या आहेत. माझ्या, माझ्या कुटुंबाच्या व माझ्या पक्षाच्या विरोधात अत्यंत खालच्या भाषेत टिका करुन त्या व्हायरल केल्या आहेत. माझी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असतानाही, या चॅनलने माझी बदनामी सुरु ठेवली आहे, असं म्हणत मंत्री गोरे यांनी त्या चॅनलवरही हक्कभंग प्रस्ताव मांडला.












Click it and Unblock the Notifications