पुण्याची ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’, जयंत पाटील यांची जोरदार टिका
पुणे : पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाते. मागील काही दिवासापासून हे शहर कधी हिट अॅन्ड रनमुळे तर कधी ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत राहिलं आहे.तर आज पुण्यातील एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा एकच खळबळ उडाली.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलीचं पाहायला मिळालं. आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी ट्टिट करुन सरकारवर चांगलीच टिका केली आहे.
जयंत पाटील एक्स सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर म्हणतात...
"गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला असून देशभर गाजलेल्या ललित पाटील प्रकरणानंतर काल पुण्यात काही अल्पवयीन मुलांचे हॉटेल मध्ये ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडियो व्हायरल झाल्यावर पुणे पोलिसांना जाग येऊन पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला. थोडक्यात काय तर पोलिसांना गुन्ह्यांची माहिती आता त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळत आहे.
अगरवाल पॉर्शे कार अपघात प्रकरणात तर थेट मुलाच्या रक्ताच्या जागी मुलाच्या आईचे रक्त बदलून ठेवण्यात आले. पैशांच्या जोरावर व्यवस्थेला कशाप्रकारे वाकवले जाते, याचे समोर आलेले हे एकमेव उदाहरण आहे. लोकांच्या नजरेसमोर कधीही आले नाहीत, असे हजारो प्रकार असावेत.
'विद्येचे माहेरघर' अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख 'ड्रग्ज व पब्जचे माहेरघर' अशी होत असून यामागे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. पुणे शहर हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे शहर आहे. मूळ पुण्याची जगभर असलेली ओळख पुसून जाऊन हे शहर आज सत्ताधारी भाजपा शिंदे गटाच्या सरकारमुळे बदनाम होत आहे". अशी पोस्ट जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मिडीयावर केली आहे.
गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला असून देशभर गाजलेल्या ललित पाटील प्रकरणानंतर काल पुण्यात काही अल्पवयीन मुलांचे हॉटेल मध्ये ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडियो व्हायरल झाल्यावर पुणे पोलिसांना जाग येऊन पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला. थोडक्यात काय तर पोलिसांना…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 24, 2024
आमदार रवींद्र धंगेकर यांचे गंभीर आरोप
संबंधित प्रकार समोर आल्यानंतर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पुणे शहर आणि आसपासच्या भागात पहाटे तीन वाजेपर्यंत पब हे चालविले जात आहेत. या विरोधात पोलिस आयुक्त कार्यालयासमोर पब चालकांची यादी वाचून दाखविली होती.
आता पुन्हा ती वेळ आणू नका, पोलिसांनी पब चालकांवर कारवाई करावी, अन्यथा पुन्हा पोलिस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. तसेच विभागाचे मंत्री शंभूराज देसाई हे केवळ कारवाई करु असे आश्वासन देतात. मात्र ते काही करत नसून ते कसाई सारखे वागतात, अशा शब्दांत काँग्रेस पक्षाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.












Click it and Unblock the Notifications