सुरेश भोळे हॅट्ट्रिक करणार का..? जळगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपसह शिवसेनेचाही दावा
suresh bhole: विधानसभा निवडणूक जवळ आली. जळगाव शहर मतदार संघातही इच्छुक आणि सगळेच पक्ष तयारीला लागले. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे सुरेश भोळे करीत आहेत. सलग दोन वेळा त्यांनी विजय मिळवला. आता हॅट्ट्रिकसाठी ते प्रयत्नशील आहेत. पण, मागील पाच वर्षांत राजकीय समीकरणे बदली. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. सध्यातरी महायुतीकडून आमदार भोळे हेच प्रमुख दावेदार आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असेल हे बघणे औत्सुक्याचे आहे.
जळगाव महापालिकेत भाजपचे विरोधी पक्षनेता म्हणून कार्य केल्यानंतर भाजपतर्फे जळगाव शहर विधानसभा निवडणुकीत दोनदा यश मिळविणारे विद्यमान आमदार सुरेश भोळे भाजपतर्फे तिसऱ्यांदा निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. आमदार म्हणून दोनवेळा केलेल्या विकास कामांच्या बळावर जळगाव विधानसभा मतदारसंघात आमदारकीची हॅटट्रीक करणार का? याकडे आता लक्ष असेल.

आमदार भोळे विरोधात 'महाविकास आघाडी'कडून माजी महापौर जयश्री महाजन उमेदवार असू शकतात. महाजन यांना महापौरपदाचा अडीच वर्षांचा कालावधी मिळाला आहे. त्या माध्यमातून त्यांनी जळगाव शहराची विकासाची कामे केल्याचा दावा केला असून आता त्या जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून त्या तयारी करीत आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने त्यांची तयारीही सुरू असून त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे दिसून येत आहे. महापौरपदावर असताना शहराच्या विकासासाठी केलेल्या कार्याच्या बळावर आपल्याला विधानसभेच्या रणांगणात यश मिळेल, असा त्यांचा दावा आहे.
भाजपकडून डॉ. अश्विन सोनवणेसुद्धा इच्छुक
महापालिकेतील भाजपचे माजी नगरसेवक, माजी उपमहापौर डॉ. अश्विन शांताराम सोनवणे हेही जळगाव विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. जळगाव विधानसभा क्षेत्रात त्यांनी नागरिकांसाठी वैद्यकीय शिबिरांसह इतर उपक्रम राबविले आहेत. पण, भोळे यांना डावलून त्यांना पक्ष उमेदवारी देणार का, हे महत्त्वाचे आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला सहा जागा मिळायलाच पाहिजे.लोकसभेत आम्ही भाजपला मताधिक्य मिळवून दिले होते. जागावाटप अजून ठरलेले नाही. मात्र, जादा जागांची मागणी आहे. मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता स्वतंत्र लढण्याची तयारीही सुरू केली आहे, असा शिवसैनिकांनी सांगितले.
भोळे यांनी मिळवला होता दणदणीत विजय
जळगाव शहर मतदार संघात 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे सुरेश भोळे यांनी 64 हजार 846 चे मताधिक्क्य घेऊन दणदणीत विजय मिळविला होता. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अभिषेक पाटील यांचा पराभव केला होता. भोळे यांना 1 लाख 13 हजार 310 मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक पाटील यांना 48 हजार 464, तर अपक्ष असलेल्या शफी अ. नबी शेख 6 हजार 330 मिळाली होती.

त्या निवडणुकीत जळगाव शहर मतदार संघात सर्वांत कमी मतदान झाले होते. यामुळे उमेदवार आमदार भोळे व राष्ट्रवादीचे उमेदवार अभिषेक पाटील यांच्या तीव्र चूरस होईल असे चित्र होते. कमी मतदानाचा निकालावर प्रभाव पडू शकतो असे सर्वच राजकीय नेते गृहीत धरीत होते. मात्र जळगाव शहर मतदार संघात आमदार भोळेंना पहिल्या फेरीपासून 3 हजारांचा लीड होता. तो वाढत वाढत 64 हजारांपर्यंत पोहोचला.
विकास कामे केली की नाही?
जळगाव शहरातील काही नागरिक म्हणतात शहरात आमदाराने विकास कामे केली नाहीत. दुसरीकडे आमदाराचे समर्थक म्हणतात, विकास कामे केली म्हणूनच दुसऱ्यांदा संधी मिळाली. आता तिसऱ्यांदाही याच बळावर निवडणूक येऊ, असा दावा त्यांनी केला.
असा आहे मतदार संघ
सन 2008 नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, जळगाव शहर मतदारसंघात जळगाव जिल्ह्यातील फक्त जळगाव महानगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. जळगाव शहर हा विधानसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे सुरेश दामू भोळे हे जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.












Click it and Unblock the Notifications