अखेर शिल्पकार जयदीप आपटेला अटक, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई
Shivaji statu colapse Case: मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील आरोपी शिल्पकार-ठेकेदार जयदीप आपटे या घटनेनंतर फरार झाला होता. दोन आठवड्यानंतर आता जयदीप आपटेला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. ठाणे ग्रामीण आणि बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा आपटेला अटक केली आहे.
26 ऑगस्ट रोजी पुतळा कोसळला तेव्हापासून सिंधुदुर्ग पोलीस आपटेचा शोध घेत होते. या घटनेनंतर मालवण पोलिसांनी आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्याविरुद्ध निष्काळजीपणा आणि इतर गुन्ह्यांप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चेतन पाटील याला गेल्या आठवड्यात कोल्हापुरातून अटक करण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर विरोधकांनी टीका केल्याने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी पुतळा कोसळल्याने एक मोठा वाद निर्माण झाला होता.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर राज्याचं राजकारण चांगलचं तापलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांची आणि शिवप्रेमींची माफी मागितली होती. पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे हा घटना घडल्यापासून फरार होता.
राज्य सरकारनेच आपटलेला लपवून ठेवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. दरम्यान पोलिसांनी आपटेच्या शोधासाठी सात वेगवेगळी पथक तैनात केली होती. ही घटना घडल्यानंतर जयदीप आपटेवर गुन्हा दाखल झाला होता. गेल्या दोन आठवड्यांपासून जयदीप आपटे फरार होता. त्याला आता कल्याणमधून अटक करण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications