Ind Vs Pak : कोलंबोच्या मैदानात हे 7 खेळाडू ठरणार 'गेमचेंजर'; उस्मान की वरुण, कोणाची फिरकी पडेल भारी
India vs Pakistan T20 World Cup 2026 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० विश्वचषक २०२६ मधील सर्वात मोठा मुकाबला आज आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे.
दोन्ही संघांनी आपापले पहिले दोन सामने जिंकून विजयाची लय कायम राखली असली, तरी आजचा सामना प्रतिष्ठेचा आणि 'सुपर ८' मधील स्थान अधिक भक्कम करण्याचा आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यात अशा ७ खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असतील, जे आपल्या कामगिरीने सामन्याचा कल बदलू शकतात.

१. अभिषेक शर्मा: पुनरागमनावर सर्वांचे लक्ष
यंग सेन्सेशन अभिषेक शर्मासाठी हा विश्वचषक आतापर्यंत संमिश्र राहिला आहे. पहिल्या सामन्यात 'गोल्डन डक'वर बाद झाल्यानंतर, पोटाच्या विकारामुळे तो दुसऱ्या सामन्याला मुकला होता. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादवने तो तंदुरुस्त असल्याची पुष्टी केली आहे. पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेणारा अभिषेक आज पाकिस्तानच्या गोलंदाजांवर तुटून पडणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
२. उस्मान तारिक: 'मिस्ट्री' अॅक्शनचा धाक?
सध्या क्रिकेट वर्तुळात सर्वाधिक चर्चा उस्मान तारिकची आहे. त्याची चेंडू टाकण्याची पद्धत (अॅक्शन) अत्यंत वेगळी असून, चेंडू सोडण्यापूर्वी तो क्षणभर थांबतो. भारतीय फलंदाजांनी नेट प्रॅक्टिसमध्ये त्याच्या अॅक्शनचे अनुकरण करून सराव केला आहे. पाकिस्तानी संघाची मदार त्याच्यावर असली, तरी भारतीय फलंदाज या 'मिस्ट्री'चा उलगडा कसा करतात, यावर पाकिस्तानचे भवितव्य अवलंबून असेल.
३. हार्दिक पंड्या: अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा
कोलंबोची खेळपट्टी फिरकीला पोषक असली, तरी हार्दिक पंड्याची भूमिका महत्त्वाची ठरेल. तो केवळ चेंडूनेच नाही तर बॅटनेही उस्मान तारिकसारख्या गोलंदाजांना प्रत्युत्तर देऊ शकतो. हार्दिकची खेळण्याची शैली 'बॅकफूट'वर आधारित असल्याने तारिकचा संथ चेंडू तो सहज सीमापार धाडू शकतो.
४. बाबर आझम: फॉर्म की 'अँकर' रोल?
पाकिस्तानचा सर्वात अनुभवी फलंदाज बाबर आझम सध्या खराब फॉर्म आणि कमी स्ट्राईक रेटमुळे टीकेचा धनी ठरत आहे. मधल्या षटकांत डाव सावरून धरण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. मात्र, भारताचे फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांच्यासमोर बाबरचा निभाव लागणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
५. वरुण चक्रवर्ती: टीम इंडियाचा हुकुमी एक्का
आयसीसी टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला वरुण चक्रवर्ती सध्या स्वप्नवत फॉर्ममध्ये आहे. गेल्या सामन्यात अवघ्या २ षटकांत ३ बळी घेणाऱ्या वरुणची फिरकी वाचणे पाकिस्तानी फलंदाजांसाठी कठीण जाणार आहे. आर. प्रेमदासाची खेळपट्टी त्याला साथ देणार असल्याने तो आज भारताचा 'ट्रम्प कार्ड' ठरू शकतो.
६. साहिबजादा फरहान: पाकिस्तानची नवी आशा
पाकिस्तानसाठी सध्या सर्वात जमेची बाजू म्हणजे सलामीवीर साहिबजादा फरहानचा फॉर्म. अमेरिकेविरुद्ध त्याने ७३ धावांची तुफानी खेळी केली होती. भारतांविरुद्धच्या मागील सामन्यातही त्याने अर्धशतक झळकावले होते. त्याला लवकरात लवकर बाद करण्याचे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असेल.
७. अबरार अहमद: फिरकीचा दुसरा चेहरा
वरुण चक्रवर्तीला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानकडे अबरार अहमद आहे. क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला हा लेग-स्पिनर आपल्या फिरकीने भारतीय फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. त्याच्या विकेट सेलिब्रेशनवरून आधीच वाद झाले असले, तरी मैदानावरची त्याची कामगिरीच आज बोलणार आहे.












Click it and Unblock the Notifications