पत्नीवर सपासप वार करुन पतीनेच तिच्या हत्येचा व्हिडीओही काढला; पुण्यातील घटनेने खळबळ
कौटुंबिक वादातून पत्नीचा खून करुन तिच्या तडफडण्याचा व्हिडीओ काढणाऱ्या पतीने स्वतः पोलिसांत जाऊन खूनाचा गुन्हा कबूल केला. पुण्यातील हडपसर परिसरातील या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पतीला अटक करत या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

नेमकं काय घडलं?
शिवदास गिते (मुळ रा. बीड, हल्ली हडपसर) हा पुणे न्यायालयात लिपिक म्हणून कामाला आहे. त्याचे व त्याची पत्नी ज्योती गिते यांचे गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद होते. आपली प्राँपर्टी हडप करण्यासाठी ज्योती कारस्थान करत असल्याचा शिवदासला संशय होता. आज पहाटे या दोघांचे याच कारणाने भांडण झाले. रागाच्या भरात शिवदास याने घरातील कात्रीने पत्नी ज्योतीच्या गळ्यावर वार केले. ज्योती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर शिवदास याने या घटनेचा व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला.
स्वतः पोहोचला पोलिसांत
पत्नी ज्योतीचा खून व या प्रकाराचा व्हिडीओ काढणाऱ्या पती शिवदास याने स्वतः चंदननगर पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर त्याने हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. प्राँपर्टी हडप करणाऱ्या पत्नीला आपण संपवलं असं त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तत्काळ त्याला अटक केली. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पुणे हादरलं
या प्रकारानंतर पुणे शहरात एकच खळबळ उडाली. यापूर्वी अनेक प्रकणामध्ये पुणे चर्चेत असताना आता पतीने स्वतःच पत्नीची हत्या केल्याने चर्चा वाढली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिवदास गिते मूळचा बीडमधील आहे. तो न्यायालयात टंकलेखक आहे. तुळजाभवानीनगर भागात तो भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होता. गेल्या काही दिवसांपासून गिते दाम्पत्यात कौटुंबिक कारणांवरून वाद व्हायचे. ज्योती आणि तिचा पती शिवदास यांच्यात बुधवारी पहाटेही असेच वाद झाले. त्यानंतर शिवदासने घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार केले. शिवदासने केलेल्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला.
घटनेचा निषेध
या घटनेनंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही. आरोपी मान वर करून, मोठं काम केल्याच्या थाटात पोलिसांसमोर येतो, असा संतप्त सवाल सुषमा अंधारे यांनी केला. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही या घटनेवरून संताप व्यक्त केला. चुकीच्या लोकांना पाठिशी घातल्यामुळे समाजात पोलिसांची दहशतच उरली नाही, असा आरोप धंगेकर यांनी केला.












Click it and Unblock the Notifications