फुटेज तपासले अन् शिक्षकच काॅप्या पुरवताना दिसले! 24 जणावर गुन्हा, आता परीक्षा केंद्रात CCTV बंधनकारक
HSC Exam 2026 english paper copy case chhatrapati sambhajinagar : जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील परीक्षा केंद्रावर बारावीच्या इंग्रजी पेपरदरम्यान सामूहिक कॉपी आणि गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी केंद्र संचालकासह एकूण २४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोषी शिक्षकांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात कॉपी बहाद्दरांचे आणि त्यांना साथ देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

भरारी पथकाची अचानक भेट आणि 'असा' उघड झाला प्रकार
१० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १.२० च्या सुमारास माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती अश्विनी लाठकर यांच्या भरारी पथकाने राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय, जैतापूर येथील केंद्रावर अचानक धाड टाकली. यावेळी काही विद्यार्थ्यांकडे मोबाईलवर सोडवलेली उत्तरे आणि हस्तलिखित झेरॉक्स प्रती आढळून आल्या.
सीसीटीव्हीने उघड केली शिक्षकांची पोलखोल
या केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, धक्कादायक वास्तव समोर आले. वर्गातील पर्यवेक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत करत असल्याचे स्पष्ट दिसले. तसेच काही विद्यार्थी एकमेकांच्या उत्तरपत्रिका पाहून बिनधास्त नक्कल करत होते.
दोषींवर कठोर कारवाईचा बडगा
१. गुन्हा नोंद: देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात एकूण २४ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २. निलंबन: जिल्हा परिषद आस्थापनेवरील ४ कर्मचाऱ्यांचे तातडीने निलंबन करण्यात आले आहे. ३. खाजगी संस्थांना आदेश: खाजगी शाळांच्या २० कर्मचाऱ्यांवर संबंधित संस्थांमार्फत निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ४. उत्तरपत्रिका जप्त: गैरप्रकार झालेल्या ३२७ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका विभागीय मंडळाकडे स्वतंत्रपणे सादर करण्यात येणार आहेत.
प्रशासनाचा कडक इशारा
जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे की, यापुढे प्रत्येक केंद्रावर CCTV सुरू असणे बंधनकारक आहे. "कॉपीमुक्त अभियान" अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, गैरप्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.












Click it and Unblock the Notifications