Hingoli News: राज ठाकरेंच्या या पदाधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू! हिंगोली- औंढा मार्गवर पीकअपची कारची धडक
Hingoli News : हिंगोलीतून मनसेसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर संतुकपिंपरी शिवारात भरधाव पीकअप वाहनाने कारला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी 11 मार्च 2025 रोजी रात्री घडली.
प्राप्त माहितीनुसार, अजिंक्य घुगे (रा. हिंगोली) असे मृताचे नाव असून मनसेचा पदाधिकारी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील मनसेचे पदाधिकारी अजिंक्य पंढरीनाथ घुगे (21) व त्यांचे मित्र दत्ता पारडकर (रा. वारंगाफाटा), निखील पोले (रा. हिंगोली) हे तिघे जण त्यांच्या कारने मंगळवारी ता. 11 रात्रीच्या सुमारास औंढा नागनाथकडून हिंगोलीकडे येत होते. यावेळी हिंगोली येथून भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.

या अपघातानंतर पिकअप चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाला. या अपघातात अजिंक्य, दत्ता व निखील तसेच पिकअप चालक देवेंद्र पांडे (रा. उत्तरप्रदेश) हे गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी परिसरातील गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र अजिंक्य घुगे यांचा मृ्त्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले. तर दत्ता व निखील यांच्यावर उपचार सुरु असून देवेंद्र यास उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.
या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत अजिंक्य हा मनसेचा पदाधिकारी होता. त्याचे सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांशी चांगले संबंध होते. मनमिळाऊ व्यक्तीमत्व म्हणून त्याची ओळख होती. त्याच्या निधनाने हिंगोली शहरावर शोककळा पसरली आहे.












Click it and Unblock the Notifications