काही लोकांनी फडणवीसांचा विश्वासघात केला, हसन मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर निशाणा
Hanus Mushrif on Samarjit Ghatge : कोल्हापूर ग्रामीण जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेतली. त्यानंतर कोल्हापुरातील राजकारणात आता मोठे बदल होण्याची चिन्ह वर्तविली जात आहेत. समरजीत घाटगे हे आगामी विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघातून अजितदादा गटाचे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शड्डू ठोकणार आहे. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात समरजीत घाटगे यांना जोरदार टोला हाणला. काही लोकांनी फडणवीसांचा विश्वासघात केला, असा आरोप त्यांनी लगावला.
कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ यांचे राजकीय वैर अनेक वर्षांपासून आहे. या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते कायम आमनेसामने येतात. अजित पवार यांनी भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत जायचा निर्णय घेतला. यात मंत्री मुश्रीफ यांनी अजित पवारांची साथ देत सत्तेत सहभागी झाले अन् मंत्रीपदही मिळवले. या घटनेनंतर कोल्हापुर भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी नाराजी व्यक्त केली. फडणवीसांचे विश्वासू अशी ओळख असताना देखील त्यांनी भाजपची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केला.

काय म्हणाले हसन मुश्रीफ?
मुश्रीफ म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा काही लोकांनी विश्वासघात केला. एखादा माणूस किती गैरफायदा घेऊन विश्वासघात करतो, हे पाहायला मिळाले. मी विश्वासघात केला नाही, मी शरद पवार साहेबांना सांगून आलो, त्यांनी मला परवानगी दिली, असेही मुश्रीफ आवर्जून म्हणाले.
तर तुमचं वाटोळच होईल
पुढे बोलताना हसन मुश्रीफ यांनी समरजीत घाटगे यांना खुलं आव्हान देखील दिले. कागलच्या जनतेने मला सहावेळा निवडून दिलं म्हणून आता हवा बदलली असेल, असं काहींना वाटते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत अशी हवा बघत राहाल. त्यात तुमचं वाटोळच होईल, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले.
..समरजित आता तुझी खैर नाही..!
अलीकडेच हसन मुश्रीफ यांनी समरजीत घाटगे यांना इशारा दिला होता. राष्ट्रवादीतून 40 ते 50 आमदार फुटून बाहेर पडले. तरीही शरद पवार माझ्याच मागे का लागले आहेत. हे कळायला मार्ग नाही. पण यानिमित्ताने मी एकच सांगेन की, पवार साहेब तुमच्याशी माझे वैर नाही आणि समरजित तुझी आता खैर नाही. ही निवडणूक नायक विरुद्ध खलनायक अशी आहे, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले होते.












Click it and Unblock the Notifications