'जरांगे माजलाय, त्याची भाषा मग्रुरीची, अटकेनंतरच कायदा कळेल',कोर्टाच्या निर्णयानंतर सदावर्ते कडाडले
Gunratna Sadavarte attack on Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे करत असलेले मनोज जरांगे-पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाने त्यांना पुढील दोन आठवडे मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी नाकारली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
आझाद मैदानात आंदोलनावर न्यायालयाची बंदी
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी गणपतीसह मुंबईत धडक देऊन आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्यांच्या या घोषणेनंतर दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये म्हणून जरांगे यांना पुढील दोन आठवडे आझाद मैदानात आंदोलन करता येणार नाही. न्यायालयाने हे देखील स्पष्ट केले की, जरांगे यांना आंदोलनासाठी नवी मुंबई, खारघर किंवा अन्य ठिकाणी परवानगी देण्याबाबत सरकार विचार करू शकते.

सदावर्तेंचा मनोज जरांगे पाटलांवर निशाणा!
उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. "जरांगे माजला आहे, त्याची भाषा मग्रुरीची आहे, त्याला अटक झाल्यानंतरच कायदा कळेल," अशा कठोर शब्दांत त्यांनी जरांगे यांच्यावर टीका केली.
सदावर्ते म्हणाले, "मुंबईला अस्थिर करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल, त्याला कायदा त्याची जागा दाखवेल." त्यांनी पुढे आरोप केला की, "मनोज जरांगे यांच्या मागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत. त्यांचे आंदोलन जरी दिसत असले तरी त्याचा आत्मा राजकीय आहे आणि ते कुणाच्या तरी हातातील बाहुले आहेत.
सदावर्ते यांनी हे देखील सांगितले की त्यांनी जरांगे यांच्या विरोधात पोलिसांत आणि न्यायालयातही अर्ज दाखल केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, आता जरांगे यांचे कोणतेही बेकायदेशीर कृत्य चालणार नाही.
भविष्यातील राजकीय दिशा
न्यायालयाच्या मनाईनंतरही मनोज जरांगे मुंबईत येण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दुसरीकडे, गणेशोत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारकडूनही जरांगे यांच्याशी चर्चा सुरू आहे.
या घडामोडींमुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले असून, पुढील काळात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications