उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं ही शिंदेंची मानसिकताच नव्हती, पण मान्य केलं; आमदाराने सांगितलं खरं कारणं
Why did Eknath Shinde accept the post of Deputy Chief Minister : एकनाथ शिंदे हे बुधवारी संध्याकाळपर्यंत उपमुख्यमंत्रिपद स्वीकारायला तयार नव्हते. मात्र, त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मनधरणी केली. आमदारांच्या विनंतीला मान ठेऊन त्यांनी अखेर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार झाले आहेत, अशी माहिती शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी दिली. ते एका वृत्तवाहिणीशी बोलत होते. शिंदे कसे राजी झालेत याची इनसाईड स्टोरी देखील त्यांनी सांगितली.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
गुलाबराव पाटील म्हणाले की, तिघे जण आज शपथ घेणार आहेत. कालपर्यंत एकनाथ शिंदे हे शपथ घेतील की नाही असं चित्र होतं. सगळ्या आमदारांनी जाऊन त्यांना विनंती केली आपल्याला सरकारमध्ये जावं लागेल आणि उपमुख्यमंत्री म्हणून या राज्याला तुमची गरज आहे. अजितदादा, देवेंद्रजी यांच्यासारखे आणि तुम्ही तिघेजण एकत्र राहिले तर राज्याच्या विकासासाठी फार मोठा फायदा होईल, असे त्यांना सांगितले. त्यांनी सर्व आमदारांचा मान ठेवून आज ते उपमुख्यमंत्रिपदाची पदाची शपथ घेणार आहेत, असे पाटील यांनी सांगितले.

शिंदेंची उपमुख्यमंत्रीपदाची मानसिकता नव्हती
गुलाबराव पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्रिपदाची मानसिकता नव्हतीच. त्यांचे म्हणणे होते की आमच्यापैकी कोणाला तरी उपमुख्यमंत्री करावे. मात्र, सगळ्यांचे म्हणणे हेच होते की तुम्ही उपमुख्यमंत्री व्हावे आणि सत्तेत राहावे. कारण तुम्ही सत्तेत असल्याशिवाय आमदारांना बळ राहणार नाही. त्यांनी आमच्या विनंतीचा सन्मान ठेवला.
शिंदे अजिबात नाराज नाहीत
गुलाबराव पाटील म्हणाले की, काही लोक म्हणत होते ते भेटत नाही. पण इलेक्शन आटोपल्यानंतर मी सुद्धा पाच ते सहा दिवस आजारी पडलो होतो. एकनाथ शिंदे यांनी तर दररोज आठ-दहा सभा घेतल्या. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सर्वांसाठी काम केले. दोन महिन्याची केलेली कसरत आता बाहेर निघत आहे. त्यामुळे ते बाहेर निघत आहे त्याचा अर्थ जर कोणी चुकीचा काढत असेल तर ते योग्य नाही. काल देखील त्यांची भेट घेतली तेव्हा देखील त्यांच्यासोबत डॉक्टर होते.












Click it and Unblock the Notifications