ठाकरे गट पुन्हा फुटणार..? 10 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा 'या' नेत्याचा दावा
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं. महायुतीकडून सध्या राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार? उपमुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? याबाबत सस्पेंस कायम आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मोदी-शहांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार बोलून दाखवलाय. तरीही एकनाथ शिंदे यांना गृहखातं मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, गृहखातं देण्यास भाजपाचा विरोध असल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहेत. या प्रकारानंतर ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली होती. याच टिकेनंतर शिंदे गटाच्या एका नेत्याने ठाकरे गटाला धक्का देणारं विधान केलंय.

मुख्यमंत्री नाराजीमुळे गेले गावी?
एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. मात्र भाजप हे पद सोडण्यास तयार नाही. त्यातच एकनाथ शिंदे हे दोन दिवस साताऱ्यातील त्यांच्या दरेगावी गेले होते. या सर्व घडामोडीवरून ठाकरे गटाने त्यांच्यावर निशाणा साधला होता. ठाकरे खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली होती. याच टीकेला उत्तर देत शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते गुलाबराव पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. 'ठाकरे गटाचे १० आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत आहेत", असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
काय आहे गुलाबराव पाटलांचा दावा?
गुलाबराव पाटील म्हणाले, "ठाकरेच्या महालामध्ये आमच्या सारख्यांची देखील एक वीट आहे. मात्र, त्या विटांना विसरले म्हणून संजय राऊत यांच्यासारखा एक दगड घेऊन आले. त्याच दगडाने त्यांच्या महालाचा सत्यानाश करून टाकला. ते जळगाव जिल्ह्यात येऊन आमच्या पाच जागा पाडणार होते. दोन दिवस जिल्ह्यात येऊन बसले, मात्र एकही उमेदवार वाचू शकले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी आता संजय राऊतांना ओळखावं. अन्यथा जे २० आमदार आहेत ना, त्यातील १० आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत आहेत.", असं गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटल्यानंतर एकच चर्चा सुरु झाली.
येत्या दोन दिवसांत होतील बैठका
एकनाथ शिंदे हे मुंबईत परतणार आहेत. त्यानंतर महायुतीच्या बैठका होतील. त्यातून मंत्रीपदे कुणाला, हे ठरविले जाण्याची शक्यता आहे. येत्या पाच तारखेला मंत्रीमंडळाचा शपथविधी आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः ही माहिती दिली. मात्र या पदाबाबत अजूनही सस्पेन्स आहे. त्यामुळे हे पद कुणाला मिळते याकडे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications