लक्ष्मण हाकेंच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ दाखल, सह्याद्रीवर बैठकीचे आयोजन
जालना : वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्याचे सहकारी नवनाथ वाघमारे उपोषणाला बसले आहेत. आजचा त्यांचा उपोषणाचा त्यांचा नववा दिवस आहे. राज्यसरकारच्या शिष्टमंडळाने उपोषण स्थळी जाऊन लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली.

या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहका-यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं अशी विनंती करण्यात आली. मात्र हाके आणि वाघमारे आंदोलनावर ठाम आहेत.सरकारच्या या शिष्टमंडळात मंत्री गिरीष महाजन, मंत्री उदय सामंत आणि आमदार गोपीचंद पडळकर आहेत. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष्मण हाके यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा करून दिली. लक्ष्मण हाके यांच्या मागण्यासंदर्भात आज संध्याकाळी पाच वाजता सह्याद्रीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ओबीसी शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करणार आहे. आता या बैठकीत नेमका काय तोडगा निघणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहका-यांनी एवढे दिवस उपोषण करणे घातक आहे. सरकारची ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी भूमिका आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सचिव यांच्यासोबत बैठक करून निर्णय घेऊ. लक्ष्मण हाके यांनी शिष्टमंडळ मुंबईला पाठवावे. लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घ्यावे आणि सरकारशी चर्चा करावी, अशी विनंती ही त्यांच्याकडून करण्यात आली.
ओबीसी आरक्षण आणि सगेसोयऱ्यांबाबत याबाबत भूमिका घ्या
यानंतर लक्ष्मण हाके म्हणाले की, सरकार म्हणतंय OBC आरक्षणाला धक्का लागणार नाहीये. सरकारने आमच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाहीये हे पाहावे, असे हाके यांनी म्हटलं आहे.ओबीसी आरक्षण आणि सगेसोयऱ्यांबाबत याबाबत नक्की भूमिका घ्या. आमच्या भवितव्याबाबत सामाजिक मागास घटकांत संभ्रम निर्माण झालाय. हा बांधवांचा रोष आहे, भावना आहे, मी मोठा माणूस नाही, आम्ही दोघे उपोषण करणारे मोठ्या घरचे नसून सामान्य आहोत. आम्हाला कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यामार्फत अथवा कलेक्टरमार्फत तुम्ही निवेदन पाठवून दिले तरी चालेल.कुणबी नोंदणी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम थांबवा, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी यावेळी शिष्टमंडळाकडे केली. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना लक्ष्मण हाके यांनी मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचं त्यांनी सांगितले आहे.
54 लाख कुणबी नोंदी रद्द करा
नवनाथ वाघमारे म्हणाले की, एका व्यक्तीमुळे राज्यात जाती जातींमध्ये तेढ निर्माण झाला आहे, सरकारने यात लक्ष घालावे. आम्हाला कोणाच्या ताटातलं हिसकावून घ्यायचं नाही. आमच्या हक्काच्या आरक्षणाचं बचाव होतो याचं लेखी उत्तर आम्हाला हवं आहे. 54 लाख कुणबी नोंदी मागच्या दाराने वाटप सुरू आहे, हे तात्काळ बंद झालं पाहिजे, 54 लाख नोंदी रद्द कराव्या.आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मरेपर्यंत उपोषण करण्याची तयारी असल्याचे म्हटलं आहे.
आतापर्यंत या नेत्यांनी लक्ष्मण हाकेच्या उपोषणाला दिली भेट
वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्याचे सहकारी नवनाथ वाघमारे उपोषणाला बसले आहेत. आजचा त्यांचा उपोषणाचा त्यांचा नववा दिवस आहे. त्या उपोषणाला आतापर्यंत भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अतुल सावे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय विजय वडेट्टीवार, वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि आज सरकारच्या शिष्टमंडाळात मंत्री गिरीष महाजन, मंत्री अतुल सावे, मंत्री उदय सामंत, आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट दिली आहे.












Click it and Unblock the Notifications