शाळेतच तीन विद्यार्थीनींसोबत घडले 'असे' धक्कादायक; नामांकीत शाळेतील प्रकाराने खळबळ
भांडूप येथील एका नामांकीत इंग्रजी शाळेत लिफ्ट दुरुस्तीसाठी आलेल्या एका कामगाराने तीन विद्यार्थीनींचा विनयभंग केला. हा धक्कादायक प्रकार या विद्यार्थीनींनी आपल्या शिक्षकांना सांगितल्यावर शिक्षकांनी या कामगाराला पोलिसांच्या स्वाधीन केले. गोपाल गौडा असे संशयीत आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयाने दोन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

भांडूपमधील शाळेतील प्रकार
भांडूप येथील एका नामांकीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एक भयानक प्रकार आज उघडकीस आला. या शाळेत इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थीनींसोबत हा प्रकार घडला. शाळेत लिफ्ट दुरुस्तीसाठी आलेल्या एका कामगाराने या विद्यार्थीनींचा विनयभंग केल्या. एका मुलीच्या पाठीवर हात फिरवत त्याने अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. इतर मुलींसोबतही तो असेच करणार, तोच या तिन्ही मुली त्याच्या तावडीतून सुटल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या मुली योगा क्लाससाठी जात होत्या.
शिक्षकांनी केले जेरबंद
या मुली घाबरलेल्या अवस्थेत थेट शिक्षकांकडे आल्या. त्यांनी हा घटलेला प्रकार शिक्षकांना सांगितला. शाळेच्या बेसमेंटमध्ये लिफ्ट दुरुस्तीचे काम करणाऱ्या या कामगाराकडे शिक्षकांनी जात त्याला याबाबत जाब विचारला. त्यानंतर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. भांडूप पोलिसांनी या गंभीर प्रकरणात तातडीने पावले उचलत आरोपीला अटक केली. गोपाल गौडा (वय २७) असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी तातडीने आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.












Click it and Unblock the Notifications