मोठी बातमी ! गेवराईमध्ये लक्ष्मण हाकेंवर दगडफेक, पाहा व्हिडिओ
बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही गट आमनेसामने आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली, ज्यामध्ये गाडीची पुढील काच फुटली.

नेमकं काय घडलं?
गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आंदोलनामुळे बीड जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण आहे. गेवराईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ लावलेल्या बॅनरवरून हा वाद सुरू झाला. यापूर्वी गेवराईत लक्ष्मण हाके यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले होते, त्याच चौकात हाके पोहोचल्यानंतर हा संघर्ष उफाळून आला.
लक्ष्मण हाके यांची गाडी शिवाजी महाराज चौकात पोहोचताच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने तिथे जमा झाले. दोन्ही गटांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. काही क्षणांतच परिस्थिती चिघळली आणि हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. चप्पलही भिरकावण्यात आल्याचे दिसून आले.
पोलिसांचा हस्तक्षेप
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गटांना शांत करण्याचा आणि जमाव पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हाके यांच्या गाडीवर झालेला हल्ला आणि दोन गटांमधील संघर्षामुळे गेवराई शहरात सध्या मोठा तणाव आहे. या घटनेमुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादाला अधिक धार येण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications