पंकजा मुंडेंच्या PAवर हत्येचा आरोप! गौरी पालवेचे वडील म्हणाले-मुलीला आधी मारले नंतर आत्महत्या दाखवली
Gauri Palve death case : राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे खासगी स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे यांच्या पत्नी, डॉ. गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक वळण आले आहे. मुंबईतील वरळी येथील राहत्या घरात २३ नोव्हेंबर रोजी गौरी यांचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी याला प्राथमिकदृष्ट्या आत्महत्या ठरवले असले तरी, गौरी यांच्या कुटुंबीयांनी ही हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. गौरीचे वडील न्याय मिळावा यासाठी आग्रही असून त्यांनी अनंत गर्जे, त्याचा भाऊ आणि बहिणीवर चौकशीची मागणी केली आहे.

वडिलांचा थेट दावा: "गौरीची हत्या झाली"
डॉ. गौरी पालवे गर्जे यांचे वडील आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत पोलिसांच्या 'आत्महत्येच्या' निष्कर्षावर समाधानी नाहीत. त्यांनी या प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
डोक्यावर आणि छातीवर खुणा
गौरीच्या डोक्यावर आणि छातीवर मारहाणीच्या खुणा असतानाही स्पॉट पंचनामा करून ही आत्महत्या कशी ठरवण्यात आली, असा सवाल वडिलांनी केला.
गुन्हेगारांची चौकशीची मागणी
गौरीची हत्याच झाली असून, अनंत गर्जे, त्याचा भाऊ अजय गर्जे आणि बहीण शीतल आंधळे यांची चौकशी करण्यात यावी.
नार्कोटेस्टची मागणी
वडिलांनी मागणी केली आहे की, गुन्हेगारांची नार्कोटेस्ट आणि ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात यावी, जेणेकरून सत्य बाहेर येईल.
बदलणारी विधाने
अनंत गर्जे आपले स्टेटमेंट वारंवार बदलत असल्याचे वडिलांचे म्हणणे आहे. तसेच, मारहाणीमध्ये गौरीचा जीव गेला आणि त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले, असा दावाही त्यांनी केला आहे.
पती अनंत गर्जेला अटक
डॉ. गौरी पालवे यांच्या आत्महत्येप्रकरणी वरळी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनेच्या दिवशी रात्री १ वाजता अनंत गर्जे याला अटक केली आहे. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या कलमातंर्गत गुन्हे दाखल!
वरळी पोलीस स्टेशनमध्ये गौरीच्या कुटुंबीयांनी धाव घेतल्यानंतर अनंत गर्जेसह त्याची बहीण शीतल गर्जे आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आत्महत्येस प्रवृत्त करणे, सासरकडून क्रूरतेची वागणूक देणे, धमकावणे अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.
अनैतिक संबंधातून वाद आणि मारहाण
गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचे लग्न याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात झाले होते. मात्र, त्यांच्या वैवाहिक आयुष्यात लवकरच अडचणी सुरू झाल्या. पालवे कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, अनंत गर्जे याचे बाहेर अनैतिक संबंध होते. यावरून दोघांमध्ये सतत वाद व्हायचा आणि गौरीला मारहाण केली जायची. याच वादातून गौरीने टोकाचे पाऊल उचलले असा प्राथमिक अंदाज आहे, तर वडिलांनी हा हत्येचाच प्रकार असल्याचे म्हटले आहे.
सीसीटीव्ही फुटेज आणि इतर आरोपींची मागणी
गौरी पालवेच्या वडिलांनी वरळी पोलिसांना पत्र लिहून पुढील मागण्या केल्या आहेत, या प्रकरणात दीर अजय गर्जे आणि नणंद शीतल आंधळे मोकाट फिरत आहेत, त्यांना तातडीने अटक करावी.
सीसीटीव्ही फुटेज
अनंत आणि गौरी राहत असलेल्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV) तपासणीसाठी मिळावे.
सीडीआर तपासणी
आरोपींचा कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) कुटुंबाला देण्यात यावा.
या हाय-प्रोफाईल प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून, वरळी पोलीस अधिक तपास करत आहेत. कुटुंबीयांच्या मागणीनुसार, हत्येच्या आरोपाखाली चौकशी होते की आत्महत्येच्या दृष्टीने तपास पुढे सरकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications