गणपतीपाठोपाठ आज घरोघरी होणार गौरी आगमण, जाणून घ्या मुहूर्त आणि पौराणिक आख्यायिका
Gauri Avahana : देशभरात गणेशोत्सवाची धामधूम आहे, गौरीचे आगमन आज होत आहे. भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते. ती एकटी येत नाही तर दोघी बहिणी येतात, म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात. गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते. गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण साजरा करण्याच्या प्रथा मात्र प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या आहेत.
काही ठिकाणी गौरी ही गणपतीची माता म्हणजेच पार्वची असल्याचे सांगितले जाते तर काही ठिकाणी ती बहिण असल्याचे मानले जाते. परंतु प्रचलित कथेनुसार, गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे. गौरी ही गणपतीची आई म्हणजे माता आहे. म्हणून काही भागात या सणाला महालक्ष्मी पूजा असे देखील म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.

गौरीच्या आवाहनाचा शुभ मुहूर्त आणि विसर्जन
10 सप्टेंबर रोजी रात्री 8.02 मिनिटांपर्यंत गौरीला घरी आणून आसनस्थ करावे. 11 सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी पूजन तिथी
दुपारी 12 च्या आधी गौरी पूजन करून गौरीला नैवेद्य दाखवावा. ज्येष्ठा गौरी विसर्जन तिथी 12 सप्टेंबर आहे. दुपारी 1.31 ते रात्री 9.51 मिनिटांपर्यंत गौरी विसर्जन करता येईल.
काय आहे पौराणिक मान्यता
समुद्र मंथनातून विष निघाल्यानंतर गौरीची उत्पत्ती झाली असे पद्मपुराणात म्हटले आहे. लाल वस्त्र परिधान केलेल्या
या देवीला चार हात होते. एका हातात अभय मुद्रा, दुसऱ्या हातात आशीर्वाद मुद्रा, तिसऱ्या हातात बाण आणि चौथ्या हातात धनुष्य होते. ती नेहमी कमळावर विराजमान होत असते. पिंपळ हे तिचे निवासस्थान मानले जाते.
पौराणिक मान्यतेनुसार, राक्षसांनी पीडित पृथ्वीवरील स्त्रियांनी आपल्या पतीच्या रक्षणासाठी गौरीकडे आश्रय घेतला होता. तेव्हा गौरीने असुरांचा वध करून पृथ्वीवरील स्त्रियांचे शील रक्षण केले. त्यामुळे तिच्याप्रती कृतज्ञता म्हणूनही गौरीचे व्रत करतात. गौरीच्या पूजेने दु:ख दूर होते, दुर्दैव नाहीसे होते, दारिद्र्य दूर होते. मन प्रसन्न होते.












Click it and Unblock the Notifications