गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना कधी करावी? गौरी आवाहन, पूजा मूहूर्त कधी? जाणून घ्या तारीख वेळ आणि महत्त्व
ganpati murti puja and gauri pujan : यंदाचा गणेशोत्सव 7 संप्टेबर पासून सुरु होता आहे. विघ्नहर्ता विनायकाच्या स्वागतासाठी सगळीकडे लगबग सुरु आहे. गणपतीच्या आगमनासोबत गौरीचे आगमन होत असते. जर तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मूर्तीची प्रतिष्ठापना करुन गणपतीची पूजा करण्याचा विचार करत असाल तर, तसेच तुमच्या घरी गौरीचेही आगमन होत असेल तर गणपतीची प्रतिष्ठापना, गौरी पूजन तारीख वेळ, मंत्र आणि विधी याविषयी तुम्हाला माहिती पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया.
आपल्याकडे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणेशपूजनाने होते. पण जेव्हा गणेश चतुर्थीला देखील गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतो तेव्हा देखील मुहूर्ताचे महत्त्व आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवश श्रीगणेशाचे आगमन होते, या दिवशी गणपतीची मूर्ती आणून तिची पूजा करुन प्रतिष्ठापना केली जाते.

या वर्षी 7 सप्टेंबर रोजी ब्राह्ममुहूर्तापासून मध्यान्हापर्यंत कोणत्याही वेळी घरगुती गणपतीची स्थापना आणि पूजा करता येईल तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना दुपारदेखील केली जाऊ शकते. दाते पंचागकर्त्यांनुसार यावर्षी गणेश पुजनासाठी विशेष नक्षत्र, योग, विष्टि, तसेच राहुकाल, शिवालिखित इत्यादी कोणतीही कोष्टके पाहण्याची आवश्यकता नाही.
कधी कराल गणेश पूजा?
घरातील गणेशमूर्ती जास्तीत जास्त वीतभर उंचीची आणि आसनस्थ असावी. गणपतीची सोंड उजवी किंवा डावी यात चांगले वाईट असे काही नसते. गणपतीपूजेमध्ये मूर्तीऐवजी सुपारी ठेवून तिच्यावर गणपतीचे आवाहन केले जाते.काही ठिकाणी सुपारी एेवजी नारळ ठेवला जातो. यावेळी "कार्यं में सिद्धिमायातू प्रसन्न त्वयि धातारि। विघ्नानि नाशमायान्तू सर्वाणि सुरनायक।।" या मंत्राने प्रार्थना करावी. अशा प्रकारे सुपारीच्या गणपतीचे पूजन करुन नंतर आपण आणलेल्या गणेशाच्या मूर्तीच्या पूजनास सुरुवात करावी
गणेश विसर्जन मुहूर्त कधी आहे?
अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन केले जाते. यंदा 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी मंगळवार म्हणजे विघ्नहर्ता गणेशाचा वार आहे. गणेश विसर्जन तिथी दुपारी पावणेबारा वाजताच संपत असली तरी विसर्जन त्यानंतर देखील करता येईल.
गौरी आवाहन पूजन, विसर्जन मूहूर्त
भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात.
यंदा मंगळवारी 10 सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्रावर रात्री 8 वाजून 04 मिनिटांपर्यंत कधीही गौरी आवाहन करता येईल. बुधवारी 11 सप्टेंबरला नेहमीप्रमाणे गौरीपूजन करता येईल तसेच गुरुवारी रात्री 9:53 पर्यंत गौरी विसर्जन करता येईल.












Click it and Unblock the Notifications