एकनाथ शिंदे म्हणाले, आता कळेल हू इज धंगेकर; पक्षप्रवेशात नेमकं काय काय झालं? वाचा...
काँग्रेसचे नेते व कसब्याचे माजी आ. रवींद्र धगेकर यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पुण्यातील असंख्य कार्यकर्त्यांचाही शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाला. या पक्षप्रवेशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्चारलेले वाक्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?
कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत २०२३ मध्ये रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे आमदार हेमंत रासने यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांची राज्यभरात चर्चा झाली. मात्र गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत धंगेकर यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आज धंगेकर यांच्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, "आता लोकांना कळेल हू इज धंगेकर?" अशी मिश्किल टिप्पणी केली.
सगळी फौज लागली
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "रवींद्र धंगेकर हे पुण्यातील लोकप्रिय नेते आहेत. स्वतःच्या कामाने त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली आहे. यांच्या पोटनिवडणुकीवेळी मी तिकडे होतो. ती निवडणूक गाजली पण, सगळी फौज लागली तरी धंगेकरांनी बाजी मारली. लोकसेवक काय असतो हे त्यांनी दाखवले. आता तुम्ही शिवसेनेत आला आहात, त्यामुळे लोकांना कळेल हू इज धंगेकर?"
कार्यकर्त्यांच्या जोरावर लढलो
आज सकाळी रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले, "पक्षातील सहकारी हे कुटुंबातील सदस्य आहेत. सर्वांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं. मी जी-जी निवडणूक लढवली त्यावेळी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी माझ्यामागे ताकद उभी केली. त्यांच्या जोरावरच मी त्या निवडणुका लढवू शकलो. आता पक्ष सोडताना मला दुःख होत आहे."












Click it and Unblock the Notifications