मोठी बातमी! गोरेगावात भीषण आग; फर्निचरचे पाच ते सात गोडावून खाक, फिल्म शुटींगचे साहित्य जळाले
मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील खडकपाडा फर्निचर मार्केटमध्ये आज सकाळी ११.१५ च्या सुमारास भीषण आग लागली. लाकडी वस्तूचे समान ठेवलेल्या पाच ते सहा गाळ्यांना आग लागली असून आगीची तीव्रता वाढली आहे. तब्बल दोन हजार चौरस मीटर परिसरात ही आग पसरली आहे. या आगाीत आत्तापर्यंत पाच ते सात गोडावून जळून खाक झाले आहेत.

कशी घडली दुर्घटना?
गोरेगाव पूर्वेकडे रहेजा इमारत परिसरात खडकपाडा येथील फर्निचर मार्केटमध्ये सकाळी अचानक मोठी आग लागली. आगीमुळे आसपासच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. घटनास्थळी अग्निशमन दलाचा ताफा आग विझवण्याचे काम करीत आहे. आठ फायर इंजिन, पाण्याचे पाच ट्रॅन्कर घटनास्थळी असून आगीची तीव्रता वाढल्याचे अग्निशमन दलाने जाहीर केले आहे. ही आग वाढतच असल्याचे परिसरातील स्थानिकांचे म्हणणे आहे.
किती झाले नुकसान?
या आगीत लाकडी सामान, प्लास्टिक, थर्माकोल, प्लायवुड, भंगार सामान आदी मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले. अग्निशमन दलाने सुरुवातीला श्रेणी १ ची त्यानंतर श्रेणी क्रमांक २ ची वर्दी दिली. क्षणाक्षणाला आग अक्राळविक्राळ रुप धारण करीत आहे. अग्निशमन दलाने अखेर बारा वाचेच्या सुमारास श्रेणी ३ ची वर्दी दिली. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.
फिल्म शुटींगचे साहित्य जळाले
गोरेगावमध्ये लागलेल्या आगीत फिल्म शुटिंगच्या सामानाचे नुकसान झाले. फर्निचर मार्केटमधील लाकडाच्या गोडाऊनला ही आग लागली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू हे सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे मात्र समजू शकले नाही. या आगीची चौकशी करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. या आगीच फिल्म शुटींगसाठीच्या साहित्य जळून खाक झाल्याचे सांगण्यात येते.












Click it and Unblock the Notifications