बापरे! मुंबई विमानळाच्या पार्कींगमध्ये हीट अँण्ड रन; दोन विदेशी प्रवाशांसह तीन क्रू मेंबर...
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ मधील पार्किंगमध्ये हिट अँड रनची घटना घडली. रविवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या हिट अँड रनमध्ये पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन परदेशी प्रवाशांचा समावेश आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

नेमके काय घडले?
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-2 येथील पार्किंगमध्ये आज सकाळी 9.30 च्या सुमारास ही घटना घडली. प्रवाशाला सोडण्यासाठी आलेल्या मर्सिडिज गाडीने धडक दिल्याने हा अपघात झाला. मर्सिडिजच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. त्यात 5 जण जखमी झाले. या पाच जखमींपैकी दोघे झेक रिपब्लिक या देशातील नागरिक आहेत, तर इतर तिघे विमानतळावरील क्रू मेंबर आहेत. या जखमी परदेशी नागरिकांना तात्काळ नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर क्रू मेंबरना कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
नवी मुंबईतील एका हॉटेलमधून प्रवाशाला घेऊन ही मर्सिडिज विमानतळावर आली होती. गेट नं-1 जवळ आल्यावर स्पीड ब्रेकरवरील नियंत्रण सुटल्याने चालकाने ब्रेक मारण्याऐवजी अॅक्सिलेटर जोरात दाबले. त्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याने समोरच्या वाहनाला धडक दिली. यावेळी त्याच्या गाडीसमोर आलेले पाचजण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गाडीचा चालक आणि गाडी ताब्यात घेतली आहे. या गाडी चालकावर सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.












Click it and Unblock the Notifications