Baba Siddiqi : हल्लेखोरांनी फटाके वाजवून त्या आवाजात केला गोळीबार, कसा घडला हल्ल्याचा थरार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. सगळीकडे दसऱ्याची धामधूम असल्यामुळे रोषणाई होती. फटाकेही वाजवले जात होते. याचा फायदा घेऊनच हल्लेखोरांनी फटाके वाजवले आणि त्या आवाजात बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. तीन ते चार जणांनी हा गोळीबार केला, अशी माहिती आहे.
बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोरच बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला. ज्या भागात झिशान सिद्दीकी हे आमदार आहेत तिथेच ही घटना घडली आहे.

गोळीबाराची ही घटना घडल्यानंतर बाबा सिद्दीकी यांना मुंबईच्या बांद्र्यामध्ये असलेल्या लीलावती हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण या गोळीबारात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू ओढवला. या घटनेने राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे.
बाबा सिद्दीकी यांना केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिली होती. असं असूंनही त्यांची हत्या झाल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. आपल्या जीवाला धोका आहे, अशी भीती बाबा सिद्दीकी यांना वाटतच होती. त्यांनी याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनाही सांगितलं होतं, असं कळतं.
बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची बातमी समजताच अभिनेते संजय दत्त यांनी लीलावती हाॅस्पिटलच्या दिशेने धाव घेतली. बाबा सिद्दीकी आणि संजय दत्त यांची मैत्री जगजाहीर आहे. त्यामुळेच आपल्या मित्राच्या मदतीसाठी अभिनेते संजय दत्त त्वरेने हाॅस्पिटलमध्ये पोहोचले.
अतिशय धक्कादायक!
— Supriya Sule (@supriya_sule) October 12, 2024
मुंबईतील माजी आमदार व मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची बातमी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्यांच्यासारख्या बुजुर्ग नेत्याला भररस्त्यात गोळी झाडून मारण्यात आले. पुणे असो किंवा मुंबई राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा दाखविणारी ही आणखी एक घटना. बाबा… pic.twitter.com/3M01NqKzvO
मुंबईचे राजकारणी अशी बाबा सिद्धीकी यांची ओळख होती. पण बाबा सिद्दीकी आणि बाॅलिवूड यांचंही घट्ट नातं होतं. बड्याबड्या सेलिब्रिटींशी त्यांचे जवळचे संबंध होते. मुंबईत बांद्रामध्ये राहणाऱ्या बाबा सिद्दीकी यांच्या घरी इफ्तार पार्टीला अनेक सेलिब्रिटी येत असत.
बाबा सिद्दीकी काँग्रेसचे नेते सुनील दत्त यांच्या जवळचे होते. त्यांच्यामुळेच त्यांची संजय दत्त यांच्याशी ओळख झाली. संजूबाबा आणि बाबा सिद्दीकी यांची नंतर घट्ट मैत्री जमली. संजय दत्त मुळेच त्यांची सलमान खानशीही गट्टी झाली.
बाबा सिद्दीकी अशा प्रकारे बाॅलिवूडचेच मित्र बनले. अशाच एका इफ्तार पार्टीमध्ये फक्त सलमान खानच नाही तर शाहरुख खानही आला होता. या दोन्ही स्टार्सनी या पार्टीत एकमेकांना अलिंगन दिलं त्याची खूप चर्चाही झाली. शाहरुख खान, सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांचे हे फोटो खूप व्हायरलही झाले होते. या इफ्तार पार्टीच्या आधी शाहरुख आणि सलमान खान यांच्यामध्ये एक कोल्ड वाॅर सुरू होतं. पण या पार्टीत मात्र त्यांची दिलजमाई झाली, असं म्हटलं जातं.












Click it and Unblock the Notifications