बुलढाण्यात नगरपरिषद निवडणुकीत 'बोगस मतदार' रॅकेट उघड; दोघे ताब्यात! Video व्हायरल,लोकांनी दिला चोप!
nagarparishad election bogus voting case buldhana Video : राज्यातील २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, बुलढाणा नगरपालिकेच्या मतदानावेळी बोगस मतदार आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बोगस मतदान करताना दोन व्यक्तींना पकडण्यात आले असून, ग्रामीण भागातून गाड्या भरून हे 'बनावट' मतदार आणल्याची गंभीर माहिती उघड झाली आहे. एकीकडे अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना घडत असताना, दुसरीकडे मतदार याद्यांमधील घोळामुळे मतदारांचा मनस्ताप वाढला आहे.

बोगस मतदार पकडले, मतदान केंद्रावर गोंधळ
बुलढाणा नगर पालिका निवडणुकीसाठी आज (२ डिसेंबर) सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. मात्र, मतदानाला अवघे दीड तास उलटत नाही तोच बोगस मतदान करण्याचा प्रकार सुरू झाला. प्रभाग क्रमांक १५ मधील गांधी प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्रावर वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावावर कोथळी (ता. मोताळा) येथील एका व्यक्तीने मतदान केल्यानंतर त्याला मतदान प्रतिनिधींनी रंगेहाथ पकडले.
बुलढाण्यात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी ग्रामीण भागातून लोकांना आणून नगरपालिका निवडणुकीत बोगस मतदान करून घेत आहेत.
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) December 2, 2025
काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते या बोगस मतदारांना पकडून पोलिसांच्या हवाली करत असताना आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड याने पोलिसाला शिवीगाळ आणि… pic.twitter.com/OzplgC6zPt
पकडलेल्या व्यक्तीसोबत आणखी एक जण!
या गंभीर प्रकारानंतर मतदान प्रतिनिधींनी पकडलेल्या युवकाला चोप दिल्याची माहिती आहे, ज्यामुळे मतदान केंद्रावर मोठा गोंधळ निर्माण झाला. कोथळी, इब्राहिमपूर येथून अन्य काही लोकांना बोगस मतदान करण्यासाठी आणले गेले आहे. महत्त्वाचे म्हणजे, घाटाखालून जवळपास दोन गाड्या भरून बुलढाण्यामध्ये बोगस मतदार आणले गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने या गंभीर बाबीची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
खासगी वाहनांतून मतदार आणल्याचा आरोप!
काँग्रेसचे उमेदवार दत्ता काकास यांनी बुलढाण्यातील अनेक मतदान केंद्रांवर ग्रामीण भागातून खासगी वाहनांद्वारे बोगस मतदार आणून त्यांच्याकडून मतदान करवून घेत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपाला पुष्टी देणारे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरल होत आहेत. बोगस मतदान करताना पकडलेल्या व्यक्तींच्या माहितीमुळे हा आरोप अधिक बळकट झाला आहे.
मतदार यादीतील घोळ, मतदारांचा संताप!
बुलढाण्यात बोगस मतदारांचा घोळ सुरू असतानाच, पालघरच्या डहाणू येथे मतदार याद्यांमधील गोंधळामुळे सामान्य मतदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. डहाणू नगरपरिषद प्रभाग क्रमांक १२ सेंट मेरिज मतदान केंद्रावर अनेक मतदारांची नावे दुबार यादीत असल्याने त्यांना मतदानापासून रोखले जात आहे. "मतदारांचे नाव दुबार यादीत आहे, त्यात मतदारांची काय चूक?" असा संतप्त सवाल मतदारांकडून उपस्थित केला जात आहे.
ईव्हीएम बिघाड, बोगस मतदारांचा वापर आणि यादीतील घोळ या तिन्ही कारणांमुळे या निवडणुकीच्या प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, निवडणूक आयोगाने या गंभीर प्रकरणांची दखल घेऊन तातडीने चौकशी करण्याची गरज आहे.












Click it and Unblock the Notifications