इमोजीतून व्यक्त होते प्रेम, भावना, का साजरा करतात वर्ल्ड इमोजी डे? जाणून घ्या कुणी लावला शोध
मुंबई - सोशल मीडियावर तुम्ही चॅट करताना इमोजीचा वापर करता. हो ना.. चॅटींग करताना जिथे शब्दावाचून कळते ते म्हणजे इमोजीद्वारे, हे इमोजीच तुमचे शब्द बनतात. तुमच्या भावना, प्रेम, राग, नाराजीही समोरच्यापर्यंत पोहचवतात. जेवढे चॅट करतात तेवढे इमोजीचा वापर करतात. पण तुम्हाला माहीतेय का की इमोजीचा शोध कुणी लावला आणि वर्ल्ड इमोजी डे का साजरा करतात? चला तर जाणून घेऊया.
आज 'वर्ल्ड इमोजी डे'
आज 17 जुलै, 'वर्ल्ड इमोजी डे' आहे. सध्याच्या आधुनिक युगात सोशल मीडियाद्वारे आपण एकमेकांशी जोडले जातो. सोशल मीडिया एकमेकांसोबत संवाद साधताना आपण इमोजीचा वापर करतो.

आपण चॅट, पोस्ट किंवा कमेंट करताना सर्रास इमोजीचा वापर करतो. त्यामुळे इमोजी आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. इमोजीमुळे आपण आपल्या मनातील भावना समोरच्यापर्यंत उत्तमरित्या पोहोचवू शकतो अगदी न बोलताही.
हा रुसवा सोड सखे...
एखादा प्रियकर जेव्हा आपल्या रुसलेल्या प्रेयसीची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा हा रुसवा सोड सखे हे गाणे गुणगुणतो. हेच काम इमोजी चॅटींगवर करतात. रुसलेली प्रेयसी आपल्या प्रियकराला इमोजीद्वारे नाराज असल्याचे सांगते आणि प्रियकरही इमोजीद्वारे क्षमा कर असे म्हणून तिची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतो. हे उदाहरण येथे यासाठी की, इमोजीची ताकद काय आहे याची आपणाला कल्पना येईल. चला तर इमोजीचा शोध कुणी लावला हे जाणून घेऊ.
इमोजीचा शोध कधी, कुठे आणि कुणी लावला?
इमोजीचा शोध जपानमध्ये लागल्याचे सांगितले जाते. शिगेताका कुरिता यांनी 1998 इमोजीचा शोध लावला. जगातील पहिला इमोजी त्यांनी एका टेलिकॉम कंपनीसाठी तयार केला होता. 1990 च्या दशकाच्या शेवटी इमोजीचा शोध लागला. शिगेताका कुरिता एका एनटीटी डोकोमो या टेलिकॉम कंपनीसाठी काम करत होते. मेसेजमध्ये आपली भावना अधिक चांगल्याप्रकारे मांडण्यासाठी त्यांनी फोटो ऐवजी कॅरेक्टर वापरण्याची संकल्पना मांडली, यातूनच इमोजीचा जन्म झाला.
इमोजीचा इतिहास
पूर्वी ईमेल पाठवण्यासाठी अक्षरांची संख्या फक्त 250 होती. लोकांना त्यांच्या भावना इतक्या कमी शब्दांत समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता येत नव्हत्या. ही अडचण दूर करण्यासाठी कुरिता यांनी पहिल्यांदा इमोजी बनवण्यास सुरुवात केली. 1998 च्या शेवटी आणि 1999 च्या सुरुवातीला इमोजीचा वापर सुरु झाला. त्यानंतर हळूहळू 2010 नंतर इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. 1999 मध्ये शिगेताका कुरिता यांनी इमोजीचा पहिला सेट जारी केल्या. या इमोजी सेटमध्ये स्माईली, राग अशा वेगवेगळ्या भावनांचे इमोजी होते.
'इमोजी डे' का साजरा केला जातो?
इमोजीपीडिया या वेबसाईटने 'इमोजी डे' साजरा करण्याची संकल्पना सुरु केली. आपल्या आयुष्यामधील इमोजीचे महत्त्व पटवून देण्यासाठी इमोजीपीडिया ऑनलाइन वेबसाइटच्या संस्थापकांनी पहिल्यांदा इमोजी डे साजरा केला. 2014 पासून 'इमोजी डे' साजरा केला जातो.
इमोजीपीडिया ही एक युनिकोड मानक ऑनलाइन वेबसाइट आहे. ही वेबसाईट इमोजी आणि त्यांच्या डिझाइनची नोंदणी करते. इमोजीपीडियाचे संस्थापक जेरेमी बर्गे यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा 'इमोजी डे' साजरा करण्यास सुरुवात केली होती. 2010 मध्ये इमोजींचा वापर वाढला आणि 'वर्ल्ड इमोजी डे' जगभरात साजरा होण्यास सुरुवात झाली.
इमोजीमध्ये मानवी भावभावना
राग, लोभ, आनंद, रुसवा-फुगवा, प्रेम, चिड व्यक्त करण्याचे साधन म्हणजे फक्त शब्दच नाही तर इमोजीही आहेत. मानवी भावभावनांचा प्रभावळ म्हणजे इमोजी असे म्हणता येईल. विशेष म्हणजे सुरुवातीच्या इमोजी आणि आताच्या इमोजीमध्ये मोठे फरक दिसतात. आगामी काळात वेगवेगळे इमोजीही दिसून येतील. जेवढ्या मानवी भाव -भावना तेवढे इमोजी सध्या तरी आपणास प्रत्येच चॅटबाॅक्समध्ये पाहायला मिळतात.












Click it and Unblock the Notifications